पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि ढोल-ताशामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या या गोष्टी बंद कराव्यात, अशी आग्रही भूमिका विद्यानंद बापट यांनी घेतली आहे. बापट यांच्या भूमिकेला सत्ताधारी भाजपसह अनेक गणेशोत्सव मंडळाकडून विरोध आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यातील गणेशोत्सवाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव आणि त्यातील ध्वनिप्रदूषण यावर भूमिका मांडली. ते म्हणाले की, आपले सण आणि उत्सव साजरे करताना ते जास्तीतजास्त परंपरा पाळून साजरे व्हावेत. डीजेसारख्या काही पद्धती वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यांचे स्तोम लोकसहभागाने कमी करावे लागणार आहे. तोपर्यंत पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषण करून गणेशोत्सव साजरा करावा.
सण आणि उत्सव हे अधिकाधिक पारंपरिक पद्धतीने साजरे व्हायला हवेत. मात्र, या उत्सवांमध्ये वर्षानुवर्षे काही पद्धती पडतात. अशा पद्धती बंद करताना केवळ कायद्याचा बडगा उगारणे योग्य ठरत नाही. त्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन आणि त्यावर चर्चा करून मार्ग काढावा लागतो. त्यादृष्टीने पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गणेशोत्सवातील सर्व घटकांसोबत चर्चा केली आहे. त्यात बऱ्याच गोष्टींवर एकमत झाले आहे. त्यातून योग्य़ तोडगा निघेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
डीजेमुळे भूकंपासारखा आवाज
डीजेमुळे लोकांना खूप त्रास होतो. त्यातून भूकंप झाल्यासारखा आवाज निर्माण होतो. अशा सगळ्या गोष्टी घडू नयेत, यावर सर्वांचेच एकमत आहे. त्यामुळे पुण्यात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे. आगामी काळात डीजेचे स्तोम कमी झालेले दिसेल अथवा ते संपलेले दिसेल. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने किंवा किमान ध्वनिप्रदूषणासह साजरा करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेवर रविवारी मोर्चा
विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी (३ ऑगस्ट) पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका देखील मांडल्या आहेत. बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ आणि ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बापट यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. मी जिवंत असेन तर मोर्चात सहभागी होणार आहे, असे बापट यांनी स्पष्ट केले.
