पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुण्याच्या पारंपरिक गणेशोत्सवाचे स्वरूप पालटत असून, गणेशमंडळातील तरुण पीढीकडून मिरवणुकीसाठी डीजे, लेझर लाईट्स अशा आधुनिक उपकरणांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र, शहरातील नागरिकांकडून ध्वनिक्षेपक भींती आणि त्यातून होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाला विरोध करण्यात येत आहे. गणेश मंडळांनी ‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका नागरिकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली.
‘डीजे, स्पीकरच्या भिंती, प्लाझ्मा या गोष्टी आपल्या संस्कृतीच्या कधीच भाग नव्हत्या. त्यामुळे त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीचे निर्णय घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी सोलापूरमधील सर्व पक्षीय नेत्यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवही उत्तम पद्धतीने साजरा करता येतो, हे दाखवून दिले. पुणे तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे उगमस्थान आहे. त्यामुळे शहराने डीजेच नव्हे, तर लेझरमुक्त गणेशोत्सव साजरा करुन संपूर्ण महाराष्ट्रासमोर उदाहरण घालून देणे आवश्यक आहे. त्यासाठी महापौरांनी पुण्याच्या प्रथम नागरीक म्हणून, पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले.
‘गणेशोत्सव काळात संपूर्ण दारू बंदी हवी. स्पीकरवर भक्ती गीते, आरती, सांस्कृतिक, देशभक्तीपर आणि सामाजिक देखाव्या व्यतिरिक्त (योग्य डेसिबल ठेवून) काहीही वाजणार नाही. देवासमोर अश्लील नृत्य होणार नाही. सामान्य नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि मिरवणूक संपली की मांडव, मिरवणूकीचे गाडे, देखावे आदी २४ तासात काढले जातील, रस्ते पूर्ण मोकळे होतील, यावर हिंदुत्ववादी आणि धर्माभिमानी पक्षाच्या १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी प्रश्न मांडले पाहिजेत. असे असूनही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत, हे विशेष. धर्म फक्त राजकारणापुरताच मर्यादित आहे का?’ असा सवाल महेश लिमये यांनी उपस्थित केला.
‘गणेशोत्सवाला जागतिक कीर्ती प्राप्त झालेली आहे. पण, स्पीकर्स आणि लेझर लाईटच्या मर्यादा ओलांडून आपणच गणेशोत्सवाला गालबोट लावत आहोत. धार्मिक पावित्र्य आणि रुढी-परंपरांचे भान सार्वजनिक मंडळांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना राहिलेले नाही. स्पीकर्सना विरोध नाही. विरोध आहे, तो अमर्याद आवाजाला आणि लेझर लाईट्सला. सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ होईल, असा कर्णकर्कश्य आवाज आणि लेझर लाईटचा वापर करून आपण काय साध्य करणार आहोत? याविषयी एकही नगरसेवक, आमदार आणि खासदार शब्दही बोलत नाहीत, हे पुणेकरांचे दुर्दैव आहे,’ अशी खंत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विलास लेले यांनी व्यक्त केली.
