पुणे : गेल्या महिन्याभरापासून उत्सवांतील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा गाजत असताना यंदा विसर्जन मिरवणुकीत उच्चांकी ध्वनिपातळी नोंदवली जाऊन मिरवणूक अधिकच दणदणाटी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख दहा चौकात घेतलेल्या नोंदींतून सरासरी १०४.५ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ध्वनिपातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच करोना प्रादुर्भावानंतरची ही दुसऱ्या क्रमांकांची ध्वनिपातळी ठरली आहे.

सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाने या बाबतचा अहवाल जाहीर केला. विद्यापीठातील उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख चौकात शुक्रवारी आणि शनिवारी वेगवेगळ्या वेळी ध्वनिपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. या ध्वनिपातळीच्या नोंदीचे विश्लेषण करून त्याची सरासरी काढण्यात आली. त्यातून ध्वनिपातळीचे चित्र स्पष्ट झाले. गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ सीओईपीकडून ध्वनिपातळीच्या नोंदी घेऊन अहवाल तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. 

लक्ष्मी रस्त्यावरील बेगबाग चौक येथे १०४, गणपती चौक येथे १०३.३, लिंबराज चौक येथे १०३.५, कुंटे चौक येथे १०२.८, उंबऱ्या गणपती चौक येथे १०४.१, गोखले चौक येथे १०४.१, शेडगे चौक येथे १०६.३, होळकर चौक येथे १०६.८, टिळक चौक येथे १०५.५, खंडोजीबाबा चौक येथे १०४.२ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली. त्यामुळे होळकर चौकात सर्वाधिक ध्वनिपातळीची नोंद झाली. शुक्रवारी मिरवणूक सुरू झाल्यापासूनच ध्वनिवर्धक, ढोलताशांच्या दणदणाटामुळे ध्वनिपातळी सातत्याने ९० डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रात्री आठ वाजता गोखले चौक येथे ध्वनिपातळी तब्बल ११५.४ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. तर शनिवारी पहाटे चार वाजताही ध्वनिवर्धक बंद असताना ढोलताशांचे वादन सुरू असताना ध्वनिपातळी सातत्याने १०० डेसिबलपेक्षा अधिक राहिल्याचे अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

गेल्या दहा वर्षांतील वर्षनिहाय सरासरी ध्वनिपातळी (डेसिबलमध्ये)

 २०१६ – ९२.६

 २०१७ – ९०.९

 २०१८ – ९०.४ 

 २०१९ – ८६.२

 २०२० – ५९.८

 २०२१ – ५९.८

 २०२२ – १०५.२

 २०२३ – १०१.२

 २०२४ – ९४.८

 २०२५ – ९२.६ 

 २०२६ – १०४.५ 

ध्वनिपातळीचे निकष

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार सकाळी सहा ते रात्री १० या वेळेत औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसात ६५, रात्री ५५, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५, तर शांतता क्षेत्रात ५० आणि रात्री ४० डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे.