पुणे : विसर्जन मिरवणुकीत भाविकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून ६३ मोबाइल संच, मोटार असा ३० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले ११ आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील आहेत.

अब्दुल कादीर नूर मोहम्मद (वय २८), अब्दुल मलीक अब्दुल खालीक (वय २२), जियाउल रहेमान शौकत हुसेन (वय २६), मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (वय ३१), फैसल अजीज खान (वय २४), हुजेफा अंजूम मोहम्मद साजीद (वय ३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद (वय ३५), अजहर अहमद अल्ताफ अममद मोमीन (वय ३०), नावेद अख्तर शफीक अहमद अन्सारी (वय ३३), अतहर अहमद एजाज अहमद (वय २३, सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक), अतुल मारोती इंगळे (वय २४, रा. गिरोली, जि. वाशीम) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. विसर्जन मिरवणुकीत भाविकांची लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरात गर्दी झाली होती. विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल संच चोरणारी चोरट्यांची टोळी नदीपात्र परिसरात लूटमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले.

चौकशीत चोरट्यांनी विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत भाविकांकडील मोबाइल संच चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६३ मोबाइल संच आणि मोटार जप्त केले. चोरटे विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी करण्यासाठी खास मोटारीने मालेगावातून पुण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल संच चोरण्यासाठी चोरटे मोटारीने पुण्यात आले होते, अशी माहिती तपासात मिळाली. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मनीषा वलसे, सहायक फौजदार प्रदीप खळदकर, गणेश चोबे, तेजस चोपडे, गणेश जाधवर, बिडे, वालकोळी, सावके, वाघ, बेडवाल, भोसले, येसनपुरे यांनी ही कामगिरी केली.