पुणे : ‘विसर्जन मिरवणूक किती तास चालली, हा प्राधान्याचा विषय नाही. मिरवणुकीसाठी उसळलेल्या गर्दीचे व्यवस्थापन, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तसेच कार्यकर्त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी गर्दीचे नियोजन, महिलांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडला नाही’, असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी दिले.

विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले शेवटचे मंडळ लोकमान्य टिळक चौकातून शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मार्गस्थ झाले. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर बंदोबस्त मागे घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, तेजस्वी सातपुते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘मिरवणुकीला लागणारा वेळ कमी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक मध्य भागात गर्दी करतात. विसर्जन मार्गावरील बंदोबस्त वेगळा असतो. दुतर्फा भाविकांची गर्दी असते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले असतात. विसर्जन मार्ग अरुंद आहे. अशा परिस्थितीत मंडळ लवकर मार्गस्थ करणे किंवा मिरवणुकीचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केल्यास चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. गोंधळही उडू शकतो. अशा परिस्थिती मिरवणुकीच्या वेळेपेक्षा भाविक, कार्यकर्त्यांची सुरक्षा महत्त्वाची ठरते. मिरवणुकीचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे ठरते’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नमूद केले.

‘मानाची मंडळे वेळेत मिरवणुकीत सहभागी झाली. मानाच्या मंडळाच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. गर्दी वाढल्यानंतर काहीसा विलंब झाला. विसर्जन मार्गावरील प्रमुख चौकात गर्दी झाली होती. पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले’, असे त्यांनी सांगितले.

मिरवणुकीच्या गर्दीतून ३४ रुग्णवाहिका मार्गस्थ

‘विसर्जन मार्गावर गर्दी होती. अशा परिस्थितीत पोलिसांनी ३४ रुग्णवाहिका मार्गस्थ केल्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भाविकांनी सहकार्य केले. मेट्रोतून सहा लाख प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो स्थानकाच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता’, अशी माहिती त्यांनी दिली.

ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

‘गेल्या वर्षीपेक्षा मंडळांनी यंदा ध्वनिमर्यादेचे पालन केले. मात्र, ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळाच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेची तपासणी करण्यात आली आहे. २४ सप्टेंबरपर्यंत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी २१ गुुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण, तसेच मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

बापट यांच्या चित्रफितीची दखल

‘काही मंडळांनी ध्वनिप्रदूषणाबाबत भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांची चित्रफीत तयार केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ही चित्रफीत तयार करण्यात आली. याबाबत बापट यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या नाराजीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे’, असे त्यांनी सांगितले.