पुणे : महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील सृष्टी डोईजड या विद्यार्थिनीची नुकतीच अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रतिष्ठित ‘वर्ल्ड लीडरशिप प्रोग्रॅम’साठी निवड झाली. धोरणनिर्मिती आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील युवकांची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. या वर्षी राज्यातून सृष्टीची एकमेव निवड झाली आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले असून, महिला शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर शाश्वत उपाययोजना राबवता याव्यात म्हणून काम करणार असल्याचा मानस सृष्टीने ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि संलग्न संस्थांच्या वतीने विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठी नऊ आठवड्यांचा नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्वर्डकडून सहकार्य आणि आर्थिक पाठबळ दिले जाते.
सृष्टीचे प्राथमिक शिक्षण गडचिरोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर, वर्ध्यातून सरकारी शाळेतून तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे गरवारे महाविद्यालयातून मानसशास्त्रात पदवीचे शिक्षण घेत असताना, सृष्टीने विविध सामाजिक संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले.
‘वडील शेती करतात. शेतीत प्रामुख्याने तांदळाचे पीक असते. शेतकरी कुटुंबात वाढल्याने शेती आणि शेतीतील प्रश्नांची जाण लहान वयातच निर्माण होत गेली. सावकारकीचा ताण माहिती होता. त्यात वरोऱ्यातून गडचिरोलीत लग्न करून आलेल्या आईने अनेक आव्हानांना तोंड दिले. तिच्यासाठी गडचिरोलीतील परिस्थिती नवीन होती. दिवसाढवळ्या गाड्या जाळल्या गेल्या, खुनाच्या बातम्या सतत यायच्या. सुरक्षेचा प्रश्न होता. त्यात शेतीतून निर्माण होणारे प्रश्नही होतेच. अशा परिस्थितीत आईचा धीर खचत चाललेला. एके दिवशी शाळेतून माघारी येत असताना पहिल्यांदा आईचा धीर खचलेला पाहिला. तेव्हा तिच्याशी बोलले आणि एक आत्महत्या होता होता वाचली. तिथूनच महिलांनाही भावना असतात, त्यांंनाही त्याची माहिती नसते, हे जाणवले. महिलांना त्यांच्या भावनांची ओळख व्हावी म्हणून काम करायचे पक्के केले. त्यातून महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करण्याची सुरुवात झाली. आता यावर अधिक चांगल्या पद्धतीने आणि व्यापक पातळीवर काम करायचे आहे,’ असे सांगणाऱ्या सृष्टीने हार्वर्डमधून आल्यानंतर भारतात जोमाने काम करण्याचा मानस व्यक्त केला.
तिला शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काम करणारे आंतरराष्ट्रीय संशोधक डॉ. विनायक हेगाणा यांनी ‘सुपर २५ प्रोग्राम’च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. हेगाणा यांच्या वतीने दर वर्षी २५ विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन दिले जाते. त्याअंतर्गत सृष्टीची निवड करण्यात आली होती. आई रंजनी, वडील दुष्यंत डोईजड यांनी दिलेले प्रोत्साहन आणि लकी खिलोसिया, शशांक सराफ, चेतना लाटकर यांनी केलेल्या सहकार्यातून हे यश संपादन केल्याची भावनाही सृष्टीने व्यक्त केली.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारच्या कृतिदलात समावेश
सृष्टीने महाविद्यालयात शिकत असतानाच शेतकरी महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘सखी’ मॉडेलची निर्मिती केली. ‘सखी’च्या माध्यमातून शेती कसणाऱ्या महिलांना त्यांच्या भावनांची ओळख करून देण्यासाठी काम केले जाते. या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या कृतिदलात सृष्टीची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जागतिक पातळीवर शेतकरी महिलांच्या मानसिक व सामाजिक प्रश्नांना शाश्वत व नावीन्यपूर्ण संशोधकीय पद्धतीने सोडवून युवती म्हणून अशा उपक्रम व स्टार्ट-अपचे प्रतिनिधित्व भविष्यात करण्याची इच्छा आहे. – सृष्टी डोईजड
