पुणे : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठी दिले जाणारे गॅस सिलिंडरवर निर्बंध आणले आहेत. यामुळे गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम होऊन शहरातील स्मशानभूमीत असलेल्या गॅसदाहिन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.

महापालिकेची गरज लक्षात घेऊन पेट्रोलियम कंपनीने महापालिकेला सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे उपलब्धतेनुसार गॅसदाहिन्या सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

‘महापालिकेचा गॅसपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महापालिकेने संबंधित गॅस कंपन्यांशी संपर्क साधला होता. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला या संदर्भात पत्र देण्यात आले. त्यांनी महापालिकेची आवश्यकता लक्षात घेऊन सध्या ४७.५ किलो वजनाचे दहा गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेनुसार स्मशानभूमीतील गॅसदाहिन्या सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे,’ अशी माहिती विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांनी दिली.

पुढील काही दिवसांत गॅसपुरवठा नियमित राहिल्यास गॅस दाहिन्या सुरळीतपणे सुरू राहतील, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गॅसदाहिन्या बंद असल्या, तरी नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिन्या तसेच पारंपरिक पद्धतीने लाकडांच्या साह्याने अंत्यसंस्कार करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन विद्युत विभागाने केले आहे. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर म्हणाल्या,
शहरातील गॅसदाहिन्या सुरू ठेवण्यासाठी गॅस पुरवठादार कंपन्यांना पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बंद ठेवलेल्या गॅसदाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरात २० गॅस दाहिन्या

शहरातील ‘वैकुंठा’सह विविध स्मशानभूमीमध्ये सध्या २० गॅस दाहिन्या कार्यरत आहेत. याशिवाय १० विद्युतदाहिन्यादेखील अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दररोज सरासरी २० मृतदेहांवर गॅसदाहिन्यांद्वारे अंत्यसंस्कार केले जातात, तर सुमारे ३५ मृतदेहांवर विद्युतदाहिन्यांद्वारे अंत्यसंस्कार होतात. तसेच २० ते २५ मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने लाकडावर अंत्यसंस्कार केले जातात.

एका अंत्यसंस्कारासाठी ३० ते ३५ किलो गॅस

एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी साधारणपणे ३० ते ३५ किलो गॅस लागतो. एका गॅस सिलिंडरचे वजन ४७ किलो असून त्यासाठी सुमारे ४ हजार ६०० रुपये खर्च येतो. त्यामुळे गॅसदाहिन्यांच्या वापरासाठी मोठा खर्च होतो. मात्र, यामुळे पर्यावरणाची हानी होत नसल्याने पर्यावरणपूरक पद्धत म्हणून अनेक जण या पर्यायाचा वापर करतात. विद्युतदाहिनीमध्ये सतत तपमान ठराविक ठेवणे आवश्यक असल्याने त्यासाठीचा होणारा खर्च अधिक आहे. खराडी येथील विद्युतदाहिनीसाठी दरमहा सुमारे साडेपाच ते सहा लाख रुपये इतके वीज बिल येते. तर, वैकुंठ स्मशानभूमीच्या विद्युतदाहिनीसाठी दरमहा सुमारे २२ लाख रुपये इतका वीज खर्च होतो, अशी माहिती महापालिकेने दिली.