पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेल, एलपीजी आणि सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम पुण्यातही दिसून येत आहे. शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठीचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर पुरवठा सध्या बंद करण्यात आला आहे. त्याच वेळी घरगुती एलपीजी सिलिंडर ३० दिवसांतून एकदाच मागविता येणार आहे. यामुळे शहरात सध्या गॅसटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

काळाबाजार रोखण्यावर भर

केंद्र सरकारने एलपीजी पुरवठा नियंत्रित करण्याचे पाऊल उचलले आहे. सध्या व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. घरगुती ग्राहकांना आता ३० दिवसांतून एकदाच सिलिंडर मागविता येईल. सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. एलपीजीची टंचाई निर्माण होऊ नये आणि त्याचा काळाबाजार रोखला जावा, यासाठी तालुकास्तरावर तपासणी पथके नेमण्यात येणार आहेत. याचबरोबर वितरकांना या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर यांनी दिली.

८० टक्के हॉटेल बंद होतील

पुण्यात ८ ते १० हजार हॉटेल आहेत. त्यातील सुमारे ८५ टक्के हॉटेल व्यावसायिक एलपीजीचा वापर करतात, तर उरलेली पीएनजी वापरतात. सर्वसाधारणपणे एका हॉटेलकडे १ ते २ दिवसांचा सिलिंडरचा साठा असतो. हॉटेलमध्ये अग्निसुरक्षेच्या कारणास्तव सिलिंडरचा अतिरिक्त साठा करण्यास मर्यादा येतात. आता व्यावसायिक सिलिंडर पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेलचालक सध्याचा गॅस संपेपर्यंत हॉटेल सुरू ठेवतील. त्यानंतर पुण्यातील ८० टक्के हॉटेल बंद होतील. त्यामुळे हॉटेलचालकांना दररोज ८ ते १० कोटी रुपयांचा फटका बसेल. त्याच वेळी या उद्योगावर अवलंबून असलेल्या लाखो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल, असे पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले.

उद्योगांना वापर न वाढविण्याच्या सूचना

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो. सध्या पीएनजीच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. सीएनजीचा पुरवठाही सुरळीत आहे. मात्र, कंपनीने औद्योगिक ग्राहकांना सीएनजीचा वापर न वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी फेब्रुवारी महिन्याएवढाच वापर मार्चमध्ये ठेवावा, असे कळविण्यात आले आहे. एलपीजी टंचाईमुळे औद्योगिक ग्राहकांकडून सीएनजीचा वापर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सद्य:स्थितीत सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्यात अडथळा नाही, अशी माहिती ‘एमएनजीएल’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

सिलिंडरची मागणी तिप्पट

इराणच्या युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत गेल्या आठवडाभरापासून तिप्पट वाढ झाली आहे. आधी गॅसची नोंदणी केल्यानंतर दोन दिवसांत सिलिंडर घरपोच मिळत होता. आता सिलिंडर मिळण्यासाठी ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागत आहे. सध्या गॅसची मागणी वाढण्यामागे युद्धामुळे निर्माण झालेली भीती कारणीभूत आहे. ग्राहकांकडून गरज नसताना मागणी होत असल्याने गरजू ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. सिलिंडरची मागणी नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मर्यादा घातल्याने ही विनाकारण वाढलेली मागणी कमी होण्यास मदत होईल, असे एलपीजी वितरकांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेलचा तुटवडा नाही

शहरात सध्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा तुटवडा नाही. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात व्यवस्थित पुरवठा होत आहे. पेट्रोल पंपांमध्येही इंधनाचा पुरेसा साठा आहे. इंधन पुरवठ्यात कोणताही मोठा अडथळा अद्याप निर्माण झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. सध्या तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र, जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. तेल कंपन्याकडून शहरातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे, असे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी स्पष्ट केले.