पुणे : आखातातील युद्धानंतर गॅस टंचाईच्या झळा सामान्यांना बसत असून, घरगुती वापरातील गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रकार हडपसरमधील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणला. काळ्या बाजारात एका सिलिंडरची तीन हजार रुपयांना विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी ११३ टाक्या जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी होळकर याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आखातातील युद्धानंतर गॅस टंचाई जाणवू लागली. व्यावसायिक गॅस सिलिंडरवर निर्बंध आले. गॅस टंचाईमुळे उपाहारगृहचालक आणि खाणावळ चालकांनी व्यवसाय बंद केले. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने समिती स्थापन केली.
काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महादेव शिंदे हे हांडेवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी होळकर हा घरात घरगुती गॅस सिलिंडिरमधून छोट्या टाक्यात भरुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने होळकर याच्या घरात छापा टाकला. तेथून ११३ टाक्या जप्त करण्यात आल्या.
होळकरने टाक्या कोणत्या गॅस एजन्सीतून मिळविल्या, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबाेळी, महादेव शिंदे, प्रदीप बेडीस्कर, गिरीराज जगदाळे यांनी ही कारवाई केली.
तीन हजार रुपयांना विक्री
घरगुती गॅस सिलिंडरचे दर साडेनऊशे रुपये आहेत. आरोपी नितीन होळकर याने काही गरजूंच्या नावे गॅस जोड घेतले होते. गॅस कार्ड त्याने स्वत:जवळ ठेवले होते. त्यांच्या नावावर घेतलेले सिलिंडर तो छोट्या व्यावसायिक टाक्यांमध्ये भरत होता. या सिलिंडरची विक्री तो खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टाॅलधारकांना तीन हजार रुपयांना करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
