पुणे : आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली. हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून सामिष खवय्यांनी ‘गटारी’ साजरी केली. बुधवारी सकाळपासून मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती.आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी दीप अमावस्या असते. सामिष खवय्यांच्या भाषेत या दिवसाला ‘गटारी अमावस्या’ असे म्हटले जाते. अमावस्येनंतर श्रावण मास सुरू होता. श्रावण मासात सामिष पदार्थ वर्ज्य मानले जातात. श्रावण मासानंतर लगेच गणेशोत्सव, नवरात्रौत्सव असे महत्वाचे सण असतात. आषाढ महिन्यानंतर खवय्ये नवरात्रौत्सवापर्यंत सामिष पदार्थ वर्ज्य करतात.
नवरात्रौत्सवानंतर चिकन, मटण, मासळीच्या मागणीत वाढ होते. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी सामिष पदार्थांचा बेत आखण्यात आला होता. मित्र, नातेवाईकांना जेवणासाठी आमंत्रण देण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून गणेश पेठेतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. कसबा पेठेतील मटण मार्केट, लष्कर भागातील श्री शिवाजी मार्केट, पौड फाटा, पद्मावती, विश्रांतवाडी येथील बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. खवय्यांनी सकाळपासून रांगा लावून चिकन, मटण, मासळी खरेदी केली.
गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले, ‘सुरमई, कोळंबी, पापलेट या मासळीच्या मागणीत वाढ झाली. बाजारात मासळीची चांगली आवक झाली. एकूण आवक विचारात घेतल्यास मागणी कमी असल्याने मासळीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली. बाजारात एकूण मिळून २५ ते ३० टन मासळीची आवक झाली. खोल समुद्र, खाडी, नदीतील मासळी, तसेच आंध्र प्रदेशातून रहु, कतला,सीलन या मासळीची आवक झाली.’
७०० टन चिकनची विक्री
‘चिकनला मोठी मागणी होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकूण मिळून ७०० टन चिकनची विक्री झाली. मागणीच्या तुलनेत आवक चांगली झाल्याने दर स्थिर होते. एक किलो चिकनचा दर २३० रुपये किलो असा होता. सकाळपासून घरगुती ग्राहकांची चिकन खरेदीसाठी झाली होती. घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडून चिकनला मोठी मागणी होती’, अशी माहिती पुणे, पिंपरी-चिंचवड शहर बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी दिली.
हॉटेलामध्ये ‘गटारी’साजरी करण्याचा कल
‘रविवारी मटणाला मोठी मागणी होती. बुधवारी (१२ ऑगस्ट) कामाचा दिवस असल्याने नोकरदारांनी सहकुटुंब हॉटेलामध्ये जाऊन गटारी साजरी करण्यास प्राधान्य दिले. ८०० रुपये किलो दराने मटणाची विक्री झाली. हॉटेल, बार चालकांकडून मोठ्या प्रमाणावर मटण खरेदी करण्यात आली. पुणे शहर परिसरात दीड ते दोन हजार बोकडांची विक्री झाली’, असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी नमूद केले.
