पुणे : पोस्टाच्या जुन्या इमारतींमधील पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचा विश्वास पुणे डाक क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल यांनी व्यक्त केला.पुण्यातील मुख्य टपाल कार्यालयाच्या वारसा इमारतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत नमूद केले. क्षेत्रीय डाक सेवा संचालक अभिजीत बनसोडे या वेळी उपस्थित होते.
पोस्टाच्या जुन्या इमारतींमधील पायाभूत सुविधांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले असता अग्रवाल म्हणाल्या, ‘पुणे विभागात पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि सोलापूर हे चार जिल्हे येतात. पुणे डाक क्षेत्राचा विस्तार हा अत्यंत व्यापक असून, यामध्ये दहा टपाल विभाग आहेत. या विभागांच्या माध्यमातून पोस्टाच्या सेवा विनाव्यत्यय देण्यात येत आहेत. आता काही जुन्या इमारतींमध्ये पायाभूत समस्या आहेत. त्यामुळे क्षेत्रातील प्रत्येक कार्यालयांमधील पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रत्येक टप्प्यानुसार एकेका इमारतीचा पुनर्विकास करण्यात येईल. गरजेनुसार प्राध्यानक्रमाने इमारतींमधील पायाभूत सुविधा विस्तारण्यात येतील.’
‘पुण्यातील मुख्य टपाल कार्यालयाच्या वारसा इमारतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. करार पूर्ण झाल्यानंतर या कामालाही गती मिळेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘‘स्पीड पोस्ट’ बुकिंगमध्ये व्यत्यय नाही’
‘गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्टदरम्यान संपूर्ण देशभरात तांत्रिक कारणांमुळे स्पीड पोस्ट बुकिंगमध्ये ‘सर्व्हरडाऊन’ची समस्या येत होती. मात्र, त्यानंतर अशी समस्या आली नाही. काही ठिकाणी त्या-त्या कार्यालयात तांत्रिक कारणांमुळे सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवू शकते,’ असे प्रीती अग्रवाल यांनी सांगितले.
