पुणे : ‘पुण्याचे महापौर, उपमहापौर निश्चित झालेत. येत्या पाच वर्षात प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाकडून संधी मिळेल. आमच्याकडे भांडणं होत नाहीत. ती आमची परंपरा नाही. पक्ष नेतृत्वाने दिलेला आदेश, सगळ्यांना मान्य असतो. तो मान्य करावाच लागतो,’ अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समिती आणि महापालिकेतील इतर महत्त्वाच्या पदे जाहीर करण्याबाबत शनिवारी मांडली.

‘पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपचा महापौर केला. आमच्या ११९ नगरसेवकांना निवडून दिले. त्यासाठी पुणेकरांचे आभार मानतो. आता त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आमची टीम काम करेन,’ असे आश्वासनही मुरलीधर मोहोळ यांनी दिले. वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वॅमनीकॉम) च्या पदवीदान समारंभानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय सहकार विकास परिषदेच्या सचिव मीनू शुक्ला पाठक उपस्थित होत्या.

महापौर निवडीवर मोहोळ म्हणाले, ‘‘आता प्रशासक कालावधी संपेल आणि महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अशी पूर्ण लोकशाही व्यवस्था कार्यरत होईल. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि शहराच्या विकासाचे निर्णय अधिक प्रभावीपणे घेता येतील. पुण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न, वाहतूक, नद्यांचे प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सगळ्या विषयांवर अजून खूप काम करायचे आहे. शहरात समाविष्ट झालेल्या गावांचाही एकत्रित विचार करून सर्वसमावेशक आणि संतुलित विकास करायचा आहे.’’

‘पुण्याला देशातील सर्वांत चांगले शहर करणार’

‘आगामी काळात समान पाणीपुरवठा योजना, वाहतुक कोंडीचा प्रश्न, शहरातील नद्यांचे दोन्ही प्रकल्प, घनकचरा व्यस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इत्यादी प्रश्नांवर काम करावे लागणार आहे. शहर, उपनगर आणि समाविष्ट गावांचा एकत्रितपणे विचार करून एक सर्वसमावेशक, संतुलित विकास करण्यात येईल. पुण्याला देशातील सर्वांत चांगले शहर बनवण्यासाठी चांगले काम करावे लागेल,’ असा विश्वासही मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रश्नावर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आजची निवडणूक ही एक प्रक्रिया आहे. पुणे जिल्ह्याची प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती, पण मी कुठल्याही जिल्हा परिषद गटात किंवा पंचायत समितीच्या गणात प्रचाराला गेलो नाही. अशा दुःखाच्या काळात प्रचार करणे मला योग्य वाटले नाही.’

दरम्यान, महापालिकेतील महत्वाची पदे पदरात पाडून तिजोरीच्या चाव्या मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. मोहोळ यांच्या या भूमिकेमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.