पुणे : प्रेमप्रकरणातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोरपडे पेठेत घडली. तरुणाला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घोरपडे परिसरातील एकबोटे काॅलनीत राहत्य घरात एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला मुळची रायगड जिल्ह्यातील महाडची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे आरोपी महिलेशी प्रेमसंबंध होते. दोघांमधील प्रेमप्रकरणाची कुणकुण नातेवाईकांना लागल्याने त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर आरोपी महिला आणि तरुणाने एकमेकांशी बोलू नये, तसेच यापुढील काळात कोणतेही संबंध ठेवू नये, असे नातेवाईकांच्या बैठकीत ठरले. त्यानंतर आरोपी महिलेने पुन्हा त्याला त्रास देण्यास सुरुवात केली.

महिलेच्या त्रासामुळे तरुणाने घोरपडे पेठेतील राहत्या घरात नुकतीच आत्महत्या केली. महिलेच्या त्रासामुळे भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद तरुणाच्या बहिणीने दिली. त्यानंतर या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलीस उपनिरीक्षक ताळीकोटे तपास करत आहेत.