पुणे : एका बाजूला पहिल्याच लडाख मोहिमेसाठी उत्साहाने सज्ज झालेली १८ वर्षांची तनिष्का शिंदे, तर दुसऱ्या बाजूला निवृत्तीनंतरही शिखरे सर करण्याची उभारी कायम ठेवलेल्या ६० वर्षीय अंजली कात्रे… या दोघींमुळे पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेची यंदाची हिमालय मोहीम विशेष ठरत आहे. गिर्यारोहणाला वयाचे बंधन नसते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे.

ज्या वयात निवृत्ती घ्यायची वेळ येते, अशा वयामध्ये म्हणजेच वयाच्या पन्नाशीमध्ये पुण्यातील अंजली कात्रे या गिर्यारोहणाकडे वळाल्या. पन्नाशीत पहलगाम गाठून जवाहरलाल माउंटिनिरिंग संस्थेतून गिर्यारोहणाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यानंतर गिरीप्रेमी संस्थेमध्ये दहा ते सोळा वयोगटातील लहान मुलांच्या मोहिमेत सुरुवातीच्या काळात त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. यानंतर २०१८ साली माउंट कॅथेड्रिल ही मोहीम केल्यानंतर लडाखमधील काँगस्थे त्यानंतर सहा हजार दोनशे पन्नास मीटर उंचीवरील मेटेक कांग्री या मोहिमाही यशस्वी केल्या.

वयाच्या या टप्प्यावरही तरुणांना लाजवेल असा उत्साह असून, योग्य आहार, ध्यानधारणा, पुरेशी झोप, सूर्यनमस्कार, आठवड्यातून दोन दिवस ट्रेकिंग या सर्वांमुळे ऊर्जा टिकत असल्याचे त्या नमूद करतात.

आजार शरीरात नसतात ते आधी तुमच्या डोक्यात असतात. यावर मात करण्यासाठी गिर्यारोहण हा सर्वोत्तम उपाय आहे. कितीही अडसर आले, तरी ट्रेकिंगमुळे आणि व्यायामामुळे त्यावर सहज मात करता येते वयाच्या या टप्प्यावरही शरीरात कुठलाही आजार नाही. गिर्यारोहणामुळे पुढील अनेक वर्षे मी सहज ट्रेक करू शकते हा आत्मविश्वास मिळाला आहे. – अंजली कात्रे, गिर्यारोहक

गिर्यारोहण हा माझा छंद होता. मात्र, आता यातच माझे करिअर घडवण्याचा मानस आहे. यापूर्वी सह्याद्रीमध्ये अनेक छोट्या मोठ्या मोहिमा केल्या. गिर्यारोहणाचा अभ्यासक्रमही केला. आत्ताची मोहीम ही माझी पहिलीच मोहीम आहे. मला खेळाची आवड असल्याने आधीपासूनच मी माझा फिटनेस सांभाळत आली आहे. या मोहिमेसाठी वेट ट्रेनिंग ही केले आहे. आगामी काळात महत्त्वाच्या मोहिमा यशस्वी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. – तनिष्का शिंदे, गिर्यारोहक

वजन नव्हे, जिद्द ठरली खरी ताकद

गिर्यारोहणासारख्या साहसी मोहिमांसाठी उंची, वजन आणि शारीरिक क्षमता हे महत्त्वाचे निकष मानले जातात. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक जिद्दीच्या बळावर या मर्यादांवर मात करता येते, हे साताऱ्याच्या साक्षी प्रभुणे हिने सिद्ध करून दाखवले आहे. लहानपणापासूनच हिमालयातील शिखरे सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या साक्षीचे वयाच्या अठराव्या वर्षी अवघे ३८ किलो वजन होते. त्यामुळे अनेक गिर्यारोहण मोहिमांमध्ये तिला सहभागी होता येत नव्हते. तरीही तिने निर्धार सोडला नाही. तिने जवाहरलाल नेहरू पर्वतारोहण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रशिक्षणादरम्यान चक्कर येणे, थकवा जाणवण्यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागले. पण, हार न मानता तिने योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर वजन वाढवले, शारीरिक क्षमता विकसित केली आणि स्वतःला कठीण हिमालयीन मोहिमांसाठी सक्षम बनवले.

Giripremi Ladakh Expedition
गिरीप्रेमी च्या वतीने आयोजित महिलांच्या मोहिमेला उद्योजिका आणि ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी उपस्थित सर्व महिला गिर्यारोहक

अकरा महिलांचा संघ लडाखला रवाना

पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ गिर्यारोहण संस्थेच्या केवळ महिला गिर्यारोहकांचा संघ लडाखमधील मेंटोक कांग्री (६,२५० मीटर) या हिमशिखराच्या मोहिमेसाठी रवाना झाला आहे. या १६ दिवसांच्या मोहिमेत एकूण ११ महिला सहभागी झाल्या आहे. या मोहिमेला बुधवारी प्रसिद्ध उद्योजिका व ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या हस्ते भारताचा राष्ट्रध्वज देऊन सुरुवात करण्यात आली. ‘गिरिप्रेमी’च्या संस्थापिका उषाप्रभा पागे, प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे, संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते. या मोहिमेत सोनिया भावसार, देवयानी वडनेरकर, अंजली कात्रे, शीतल मुकादम, अनुष्का देव, गायत्री दमामे, चेतना शेटे, साक्षी प्रभुणे, शर्वरी परांजपे, तनिष्का शिंदे, तन्वी चव्हाण या ११ महिला गिर्यारोहकांचा समावेश आहे.