आर्थिक व्यवहारातील वादातून बालिकेचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. वैशाली पोशंटी शिंदे(वय ३०, रा. मोहोळ, जि. सोलापूर), रेश्मा समीर शेख(वय ३०, रा.कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

या प्रकरणी करिश्मा गोटुराम काळे उर्फ करिश्मा राजु पवार(वय २०,रा. चिखली, जि. सोलापूर) हिच्यासह तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजंली सिद्धेश्वर शिंदे (वय२१, रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी लोणावळा) हिने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अंजील शिदे आणि आरोपी करिश्मा काळे ओळखीच्या आहेत. आर्थिक व्यवहारातून दोघींमध्ये वाद झाले होते. करिश्मा अंजलीकडे पैसे मागत होती. तीन दिवसांपूर्वी अंजली नातेवाईकांना भेटण्यासाठी एसटी बसने पंढरपुरकडे जात होती. त्यावेळी करिश्मा आणि अंजलीची बसस्थानकात भेट झाली होती. आरोपी करिश्माने वैशाली आणि रेश्मा यांच्याशी संगनमत करून अंजलीची सात वर्षांची मुलगी तुलसीचे स्वारगेट एसटी स्थानक परिसरातून अपहरण केले. तुलसीचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून वैशाली आणि रेश्मा यांना कात्रज परिसरातून अटक केली. चौकशीत करिश्मा तुलसीला घेऊन मोहोळला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागल्याने तिने तुलसीला चिखली गावातील तिच्या आई-वडिलांच्या घरी ठेवले. करिश्मा तेथून पसार झाली. तिच्या आई-वडिलांनी तुलसीला मोहोळ पोलिसांच्या ताब्यात दिले. स्वारगेट पोलिसांनी सात वर्षांच्या बालिकेला मोहोळमधून ताब्यात घेतले आणि तिच्या आईच्या ताब्यात दिले, असे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी सांगितले.