पुणे : घरात खेळताना चार वर्षांच्या मुलीने उकळत्या पाण्याचे भांडे ओढले. त्यामुळे त्या भांड्यातील पाणी तिच्या अंगावर पडले. त्यात ती गंभीररित्या भाजली. पालकांनी तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचाराचे योग्य नियोजन करून पावले उचलल्याने या चिमुकलीचा जीव वाचला आहे.
घरात ठेवलेले उकळत्या पाण्याचे भांडे या चिमुकलीने चुकून खाली खेचल्याने ही घटना घडली. गरम पाणी तिच्या चेहऱ्यासह शरीराच्या वरच्या आणि पोटाच्या खालच्या भागावर पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजले. तिला तातडीने ‘सूर्या मदर अँड चाइल्डकेअर हॉस्पिटल’मध्ये बालअतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सुरूवातीला मुलीची प्रकृती स्थिर करण्यावर भर देण्यात आला. तिच्यासाठी ‘इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ हाती घेण्यात आला. यामध्ये त्वचेच्या पुनर्निर्मितीसाठी ‘कोलाजेन ड्रेसिंग’, संसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण आणि भाजल्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी पोषण आणि द्रव उपचारांचा अंतर्भाव करण्यात आला. तिच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी बालअतिदक्षता विभागात विशेष उपकरणांचा वापर करण्यात आला. त्यामध्ये ड्रग इन्फ्युझर पंप आणि व्हायटल सायन्स मॉनिटर यांचा समावेश होता.
याबाबत प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. अतुल गोवर्धन म्हणाले, की मुलीचे वय कमी असल्याने आणि तिचा शरीराचा सुमारे अर्धा भाग भाजल्याने तिची प्रकृती गंभीर होती. शरीराचा ३० टक्क्यांपेक्षा अधिक भाग भाजलेल्या पाच वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचा धोका मोठ्या मुलांच्या तुलनेत ४७ टक्के अधिक असतो.
भाजल्यामुळे केवळ शरीरच नव्हे तर चेहरा आणि जननेंद्रियांसारख्या भागांवरही गंभीर परिणाम होतात. अशा जखमांकडे दुर्लक्ष न करता विनाविलंब उपचारांची गरज असते आणि आम्ही तेच केले. ही मुलगी सुमारे एक महिना रुग्णालयात दाखल होती. तिच्यावरील त्वचेच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसह संपूर्ण उपचार प्रक्रियेस आणखी तीन महिने लागण्याचा अंदाज आहे.
याबाबत मुलीची आई म्हणाली, की हे सगळे एवढ्या अचानक घडले की आम्हाला सुरुवातीला त्याचे गांभीर्यच कळाले नाही. मुलीच्या शरीरावरील भाजलेल्या जखमा पाहिल्यानंतर माझ्या काळजाचे पाणी झाले. ती फक्त चार वर्षांची असून तिचे हे दुःख पाहणे खूप वेदनादायी आहे. प्रत्येक दिवस एक लढाई वाटतोय. उपचार अजून सुरू आहेत. आम्ही दररोज आशेने पुढे जात आहोत आणि तिच्या पूर्णपणे बरे होण्याची वाट पाहतो आहोत.
लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज
देशात दर वर्षी सुमारे १४ वर्षांखालील ७६ हजार बालके अपघातांमुळे भाजतात. भाजल्यामुळे होणारे मृत्यू हे अपघाती मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत. त्यामुळे लहान मुलांना घरात सुरक्षित वातावरण निर्माण करायला हवे. पालकांनी लहान मुलांपासून गरम वस्तू दूर ठेवणे आणि अपघातानंतर त्वरित वैद्यकीय मदत घेणे या संदर्भात जनजागृती वाढवण्याची गरज आहे, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले.