पुणे : पुण्याच्या सई पाटीलने १३ व्या युरोपीयन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदक मिळवण्याची कामगिरी करून पुण्याचा झेंडा फडकवला. विशेष म्हणजे, तिसरीनंतर सईने औपचारिक शालेय शिक्षण घेतलेले नाही. या स्पर्धेत भारतीय संघाला चार पदके मिळाली. जॉर्जियातील स्कालटुबो या शहरात युरोपीयन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड ही स्पर्धा ११ ते १७ एप्रिल या कालावधीत झाली. या स्पर्धेत भारतीय संघातील गुरुग्रामच्या गुंजना अगरवाल आणि तिरुअनंतपुरमच्या संजना चाको यांना रौप्यपदक, हिसारची लॅरिसा आणि पुण्याची सई पाटील यांना कांस्य पदक मिळाले. संघाचे नेतृत्व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे साहील म्हसकर, अदिती मुठखोड, अनन्या रानडे यांनी केले. २०१५ पासून या स्पर्धेत भारत सहभागी होऊ लागल्यानंतर सर्व स्पर्धकांना पदक मिळण्याची कामगिरी दुसऱ्यांदाच झाल्याची माहिती टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान केंद्राने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धेतील सहभागाविषयी सई म्हणाली, की मी तिसरीनंतर औपचारिक शाळेत गेले नाही, पण मला गणित हा विषय आवडतो. त्यामुळे मला गणित ऑलिम्पियाडची माहिती कळल्यावर उत्सुकता वाटली. गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी तयारी करत होते. मात्र, विभागीय स्तराच्या पुढे जाता आले नाही. यंदा विशेष काही तयारी न करताही प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली. निवड झाल्यावर थोडी तयारी करायला सुरुवात केली. त्यात वेगवेगळ्या प्रकारची गणिते सोडवण्याचा सराव करत होते. मात्र, दिवसातील ठरावीक वेळ तयारी, अभ्यास करणे असे काही नव्हते.

हेही वाचा : पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!

‘गेल्या वर्षी स्पर्धेची प्रश्नपत्रिका सोपी होती. यंदा मात्र अवघड होती. अनेकांना ती पूर्ण सोडवताही आली नाही. आमचा संघ फार चांगला होता. सगळेजण एकमेकांना छान मदत करत होते. त्यामुळे खूप मजा आली. यंदा स्पर्धेतील भारताची कामगिरीही फार चांगली झाली. स्पर्धेतील ५० देशांमध्ये भारताला अकरावे स्थान मिळाले. बिगर युरोपीय देशांमध्ये भारताला सहावा क्रमांक मिळाला. आशियाई देशांमध्ये भारताच्या पुढे केवळ चीन आणि जपान हे दोनच देश आहेत. त्यामुळे स्पर्धेत मिळालेले यश खूप आनंददायी आहे,’ अशी भावना सईने व्यक्त केली.

हेही वाचा : पिंपरी : आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित

केंद्रीय अणू ऊर्जा विभागाच्या अखत्यारितील होमी भाभा विज्ञान केंद्रातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, गणित अशा विषयांच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन करून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्याअंतर्गत सईची निवड झाली होती. ‘मला पाच वर्षांपूर्वी गणित ऑलिम्पियाडविषयी माहिती कळली. त्या वेळी पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानकडून मला मार्गदर्शन मिळाले होते. कोणत्याही परीक्षेसाठी म्हणून अभ्यास करण्यापेक्षा आपल्याला आवडते म्हणून अभ्यास करण्यास प्राधान्य दिले पाहिजे’, असेही सईने सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune girl sai patil solved olympiad mathematics without school education pune print news ccp 14 css
First published on: 20-04-2024 at 13:02 IST