पुणे : ‘माझे इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. मात्र, नोकरीची संधी कुठेच मिळत नव्हती. त्यामुळे मन निराश झाले होते. मात्र, सहा महिन्यांचा ‘एआय’चा (AI) अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली,’ अशा शब्दात रोटरी बिबवेवाडीच्या ‘अस्मिता नेक्स्ट’ प्रकल्पात शिकणाऱ्या मुलींनी आपला प्रेरणादायी प्रवास उलगडला.

सहा महिन्यापूर्वी समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल गटामध्ये येणाऱ्या मुलींना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे शिक्षण घेता यावे म्हणून रोटरी बिबवेवाडीने ‘अस्मिता नेक्स्ट’ हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमासाठी एचजी फाउंडेशन आणि सेरेला या संस्थांच्या मदतीने पुणे इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पुटर टेक्नॉलॉजीने (पीआयसीटी) हा एआय प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केला आहे.

या अभ्यासक्रमासाठी पहिल्या टप्प्यात २० मुलींची निवड करण्यात आली. त्यापैकी श्रावणी राऊत, तेजल राऊत, ज्ञानेश्वरी म्हैसणे, निकिता कुदळे, प्राजक्ता सिदनकर, मधुमिता जाधव आणि प्रतीक्षा कोठारी या मुलींना नोकऱ्या मिळाल्या. समाजातील आर्थिक दुर्बल गटातील मुलींना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला. या माध्यमातून वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील मुलींना मदत करण्यात येते. ज्या मुलींना परिस्थितीमुळे एखाद्या विषयातील प्रगत शिक्षण घेणे शक्य नाही, ज्यांच्याकडे उद्योगासाठीचे कौशल्याधारित शिक्षण नाही आणि ते नसल्याने अपेक्षित नोकरीच्या संधी मिळत नाही, अशा मुलींना निवड चाचणीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येतो.

परिस्थितीवर मात अन् नामांकित कंपन्यांत नोकरी

यंदा निवडलेल्या मुलींमध्ये अनेकांचे आई वडील शेतकरी आहेत. तसेच काही मुलींना वडील नाहीत. आई घरकाम करते, तर अनेकींचे वडील रोजंदारीवर काम करतात. पहिल्या बॅचमध्ये शहरातील २० मुलींची निवड करण्यात आली. त्यांना लॅपटॉप देण्यात आले. एआय व मशीन लर्निंग विषयाचे प्रशिक्षणही मोफत देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर त्यांना प्रत्यक्ष कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून कार्यप्रशिक्षण देण्यात आले. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बहुतांश मुलींना सेराला, कॅप जेमिनी, व्हॉइस वेरा, यूएसटी बंगळूरू अशा मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. त्यांना ५ ते ८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे, अशी माहिती संस्थेकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.

‘एका मैत्रिणीने एआय शिकण्याची एक चांगली संधी आहे, असे सांगत रोटरीच्या या उपक्रमाची माहिती दिली. मी त्यासाठी अर्ज केला आणि माझी निवडही झाली. त्यानंतर सहा महिने खास एआय प्रशिक्षणासाठी तयार केलेला अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याआधारे आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळवली. याशिवाय या अभ्यासक्रमामुळे संवाद कौशल्यात चांगली सुधारणा झाली. मला मशीन लर्निंग समजले,’ असा अनुभव एकीने सांगितला.

‘एआय’ने बदलले आयुष्य

‘एआय शिकताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या एका अभ्यासक्रमामुळे आपले आयुष्य बदलून जाईल, असे वाटले नव्हते. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मिळालेली नोकरी आणि व्यक्तीमत्वामध्ये झालेला अमूलाग्र बदल आम्ही अनुभविला. एआयच्या या अभ्यासक्रमातून मशीन लर्निंगपासून अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या. संभाषण कौशल्य चांगले झाल्यामुळे अनेक नव्या गोष्टी करणे शक्य झाले,’ अशी भावनाही एका मुलीने व्यक्त केली.

आयटी कंपन्याध्ये नोकरी मिळवताना घेण्यात येणारी मुलाखत कशी असते, त्याची उत्तरे कशी द्यायची असतात, अभ्यासक्रम सुरु असतानाच या सर्व गोष्टींची तयारी करून घेण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष नोकरीच्या मुलाखतीमध्ये यश मिळाल्याचे सूत्र मुलींनी उपगडले. तर, पीआयसीटीच्या प्राध्यपक गीतांजली काळे म्हणाल्या, ‘समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल गटातील मुलींसाठी हा अभ्यासक्रम तयार करून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली. मुलींनीही हा अभ्यासक्रम मन लावून पूर्ण केला. त्यामुळे त्यांना यश मिळाले.’ भविष्याचा विचार करता एआय हा आपल्या जीवनाचा आवश्यक भाग झाला असल्याचेही काळे यांनी नमूद केले.