खजुराहो येथील राष्ट्रीय बाल नृत्य महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोथरूड येथील न्यू इंडिया स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या सान्वी आणि अमोली या दोघींनी सत्रीय नृत्याचे एकल सादरीकरण केले. एकेकाळी नृत्य म्हणजे नाच हा हिणकस प्रकार म्हणून गौण लेखण्यात आलेल्या पुण्यामध्ये नृत्यपरंपरा रुजण्यासाठी अपूर्व मेहनत घेतली गेली.

ज्येष्ठ कथक नृत्यगुरू रोहिणी भाटे यांच्यामुळे मुलीच नव्हे, तर मुलांनाही नृत्य शिकण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे पुण्यामध्ये नृत्याची परंपरा निर्माण झाली. कथक, भरतनाट्यम्, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, कथकली असे विविध अभिजात नृत्यप्रकार येथे प्रस्थापित झाले. इतेकच नव्हे, तर नृत्य शिक्षण घेणाऱ्या युवकांमुळे पुण्याला नृत्याची राजधानी असेही संबोधिले जाते.

हे सांगण्याचे कारण म्हणजे पुण्याच्या लेकींची नेत्रदीपक कामगिरी उजळून निघाली आहे. खजुराहो येथील राष्ट्रीय बाल नृत्य महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि कोथरूड येथील न्यू इंडिया स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या सान्वी आणि अमोली या दोघींनी सत्रीय नृत्याचे एकल सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

जागतिक वारसा स्थळ असलेल्या खजुराहो येथील ५२ व्या प्रतिष्ठित शास्त्रीय नृत्य महोत्सवात पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय बाल नृत्य महोत्सवा’त पुण्याच्या सान्वी फुंडकर आणि अमोली धामापूरकर या नृत्य कलाकारांनी आपल्या बहारदार सत्रीय नृत्याने रसिकांची मने जिंकली.

विशेष म्हणजे, देशभरातून आलेल्या तब्बल तीनशे स्पर्धकांमधून केवळ ३१ कलाकारांची निवड करण्यात आली होती, ज्यात महाराष्ट्रातून सत्रीय नृत्यासाठी सान्वी आणि अमोली या दोघींचीच निवड झाली. मूळच्या आसामी असलेल्या सत्तरीया या शास्त्रीय नृत्याचे या दोघींनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मंचावर एकल सादरीकरण केले.

गेल्या दहा वर्षांपासून त्या ‘आदी स्कूल ऑफ डान्स’च्या संचालिका आणि भारती विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या प्रमुख डॉ. देविका बोरठाकूर यांच्याकडे नृत्याचे शास्त्रशुद्ध धडे गिरवत आहेत. तसेच त्यांना आसामचे प्रसिद्ध गुरू नरेनचंद्र बरुआ यांचेही बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. कोथरूड येथील न्यू इंडिया स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या या दोघींनी आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे.

सान्वी फुंडकरला २०२५ मध्ये प्रतिष्ठित ‘सीसीआरटी’ शिष्यवृत्ती मिळाली असून, तिने अबुधाबी येथे सत्रीय नृत्याची समूह स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. तर अमोली धामापूरकरने काठमांडू येथे झालेल्या युगल सादरीकरणात आपल्या कलेची छाप पाडली. या दोन्ही कलाकारांनी मुंबईतील काला घोडा फेस्टिव्हल आणि ‘पुणे फेस्टिव्हल’मध्येही आपल्या कलेचा ठसा उमटवला होता.

२८ मार्च रोजी पुण्यात होणाऱ्या पं. रोहिणी भाटे महोत्सवातही त्या आपल्या गुरूंसह सादरीकरण करणार आहेत. सान्वी हिला तिचे आई वृषाली फुंडकर आणि वडील महेश फुंडकर, तर अमोली हिला आई शुभदा धामापूरकर आणि वडील महेश धामापूरकर यांचे खंबीर पाठबळ लाभत आहे. गुरूंचा विश्वास आणि पालकांच्या प्रोत्साहनामुळेच खजुराहोसारख्या जागतिक व्यासपीठावर पुण्याच्या या कन्यांनी आसामची संस्कृती आणि महाराष्ट्राची कलात्मकता यांचा सुंदर संगम घडवून आणला. या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

vidyadhar.kulkarni@expressindia.com