पुणे : ‘पुणे महानगर प्रदेशच्या ग्रोथ हबचा आराखडा करण्यासाठी मॅकेंझी कंपनीकडून अहवाल तयार करण्यात येणार असून, तो नीती आयोगाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर आयोगामार्फत हा अहवाल जूनमध्ये राज्य सरकारला दिला जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

राज्य सरकारने पुण्याला ‘ग्लोबल ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नीती आयोगाच्या पुढाकारातून पुणे महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात गुरुवारी ‘पुणे ग्रोथ हब’ संदर्भात कार्यकारी समितीची बैठक झाली.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ‘मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रस्ते, रेल्वे, उड्डाणपूल, मेट्रो, भूमिगत बोगदे यांसह औद्योगिक आणि निवासी विकासावर भर देण्याची योजना याअंतर्गत आखण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालायकडून देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रांचा विस्तार, पुरंदर विमानतळ परिसरात गृहप्रकल्प, वेलनेस सेंटर, कृषी पर्यटन आणि साहसी क्रीडा सुविधा विकसित करण्याचेही विचाराधीन असून पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि सांडपाणी व्यवस्थापन या शहरासमोरील प्रमुख समस्यांवर उपाययोजना करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. विविध विभागांकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन, त्यानुसार ‘मॅकेंझी’कडून सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.

आराखडा सादर झाल्यानंतर प्राधान्याने निवडलेल्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाशी पुण्याला जोडणारे प्रकल्प, पुणे–छत्रपती संभाजीनगर महामार्ग, कल्याण-भीमाशंकर रस्ता तसेच पुणे-बेंगळुरू महामार्ग यांसारख्या प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

संबंधित सर्व विभागांकडून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांचा सखोल आढावा घेऊन ‘मॅकेंझी’कडून अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल जूनमध्ये राज्य सरकारला सादर केला जाईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.