नारायणगाव : जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) आणि राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रामध्ये (एनसीआरए) विविध ३८ पदांसाठी राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी जुन्नरमधील खोडद येथील ग्रामस्थांनी केली आहे. या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याचे आश्वासन ‘जीएमआरटी’चे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी दिले आहे.
जीएमआरटी आणि एनसीआरएमध्ये नुकतीच विविध ३८ पदांसाठी नोकर भरतीसाठी लेखी परीक्षा झाली. त्यामध्ये खोडद गावातील स्थानिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र, परीक्षा केंद्रावर झालेल्या लेखी परीक्षेत अनेक संशयास्पद बाबी उमेदवारांना आढळून आल्या. यामुळे संतप्त झालेल्या खोडद ग्रामस्थांनी या भरती प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला आहे.
या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी ‘जीएमआरटी’ प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. यानंतर ‘जीएमआरटी’चे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता, प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांनी खोडद ग्रामस्थांबरोबर ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेतली. यावेळी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सरपंच मनिषा गुळवे, उपसरपंच शुभांगी काळे उपस्थित होते. प्रा.राधाकृष्ण गायकवाड, इंद्रभान गायकवाड, शिवाजी खरमाळे, जालिंदर डोंगरे, योगेश शिंदे, नवनाथ पोखरकर, संतोष काळे, पंकज कुचिक, आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
‘खोडद ग्रामस्थांनी ‘जीएमआरटी’ प्रकल्पासाठी दिलेले योगदान मोठे आहे. नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना न्याय देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येईल. भरती प्रक्रियेची चौकशी करून खोडदच्या ग्रामस्थांना न्याय देण्यात येईल. अणुऊर्जा संचालनालय (डीएइ) कार्यालयाला माहिती देऊन नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी अभिप्राय मागवला जाईल. वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीने पुढील सर्व प्रक्रिया पारदर्शीपणा केल्या जातील.’ असे आश्वासन ‘जीएमआरटी’चे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी दिले.