पुणे : दैवी अवतार असल्याची बतावणी करून उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणात मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी फेटाळून लावला.

दैवी अवतार असल्याची बतावणी करून एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी राधामोहन मिश्रा याला अटक करण्यात आली होती. मिश्राविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात बलात्कार, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी आणि जादूटोणा प्रतिबंधक आणि निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पीडित महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

राधामोहन मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्याने हरयाणातील एका डॉक्टर कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत कुटुंबावर मानसिक आणि आध्यात्मिक प्रभाव पाडला. त्यांच्याकडून पैसे घेऊन कुरुक्षेत्र येथे आश्रम, तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. पीडित महिलेला कुटुंबापासून वेगळे पाडले. आरोपी मिश्राने महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला, अशी फिर्याद महिलेने दिली होती. पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचे सांगून मिश्राने वैद्यकीय उपचारांसाठी न्यायालयाकडे जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मिश्रा याच्या जामीन अर्जास सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी विरोध केला. ‘आरोपीची वैद्यकीय तज्ज्ञांनी तपासणी करून त्याची प्रकृती स्थिर असल्याचा अहवाल दिला आहे,’ असा युक्तिवाद गेहलोत यांनी केला.

‘आरोपीची प्रकृती स्थिर असल्याचे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अहवालातून दिसते, तसेच अटकेची कारणे आरोपीस समजावून सांगण्यात आल्याचे नोंदीतून स्पष्ट होते’, असे नमूद करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला.