पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आणंद येथील ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचे (इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट) संचालक उमाकांत दाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबतचे वृत्त दिले असून, गोखले संस्थेकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे. डॉ. अजित रानडे यांनी नोव्हेंबर २०२४मध्ये कुलगुरूपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर डॉ. शंकर दास प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. संस्थेला आता सात महिन्यांनंतर पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहेत. आयआयटी कानपूर येथून उपयोजित अर्थशास्त्रात पीएच.डी. प्राप्त केलेले उमाकांत दाश यांनी आयआयटी-चेन्नई येथील मानव्यविज्ञान आणि समाजशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले होते. त्यांना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील जवळपास दोन दशकांचा अनुभव आहे. गोखले संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दाश यांची नियुक्ती २९ जुलैपासून लागू होणार असून, त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही महिन्यांपासून गोखले संस्था आणि तिची मातृसंस्था असलेली सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. मात्र, संस्थेने हे आरोप फेटाळले आहेत. या पार्श्वभूमीवर, कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारणारे दाश यांच्यासमोर संस्थेची नव्याने घडी बसवण्यासह संस्थेला पूर्वीचा नावलौकिक पुन्हा मिळवून देण्याचे आव्हान असणार आहे.