पुणे : हडपसरमधील गुंड टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख उर्फ हट्टी रहीम शेख हा पुणे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत रविवारी ठार झाला. शाहरुख हा काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये फरारी होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केला आणि त्यानंतर चकमक उडाली.
ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मोहोळजवळ असलेल्या लांबोटी गावात घडली. शाहरुख फरारी झाल्यानंतर एका नातेवाइकाच्या घरात लपून बसला होता. पोलिसांच्या पथकाने तेथून देशी बनावटीची दोन पिस्तुले, नऊ काडतुसे आणि दोन काेयते जप्त केले आहेत.
शाहरुख हा सराईत गुंड टिपू पठाण याच्या टोळीत होता. पठाण याची हडपसरमधील सय्यदनगर भागात दहशत आहे. सय्यदनगर भागातील एका महिलेची जमीन पठाण आणि साथीदारांनी बळकावली होती. जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी पठाणने महिलेकडे २० लाखांची खंडणी मागितली. महिलेने याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पठाणसह त्याचा भाऊ इजाज सत्तार पठाण, नदीम बाबर खान, सदाम सलीम पठाण, इजाज युसूफ इनामदार, साजिद झिबराईल नदाफ, इरफान नासीर शेख, झैद सलमी बागवान, अजीम उर्फ आट्या महंमद हुसेन शेख यांना अटक करण्यात आली.
पठाणसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यात शाहरुख आणि त्याचे साथीदारही सामील होते. गुन्हा दाखल झाल्यावर ते फरारी झाले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतरही शाहरूखवर आणखी दोन प्रकरणांत गुन्हे दाखल झाले होते.
शाहरुख रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ असलेल्या लांबोटी गावातील नातेवाईक राजू अहमद शेख याच्या घरात लपल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख मोहोळ परिसरात गेले. मोहोळ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी लांबोटी गावात सापळा लावला. पोलिसांचे पथक राजू शेख याच्या घरी पोहोचले.
राजू शेख याच्या घरातील महिलेच्या मदतीने पहाटे तीनच्या सुमारास खोलीचा दरवाजा वाजवला. शाहरुखची पत्नी नफिसा हिने खोलीचा दरवाजा उघडला. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस असल्याचे नफिसाला सांगितले. पोलीस खोलीत शिरल्याचे पाहताच शाहरुखने त्याच्याकडील पिस्तुलातून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये तो जखमी झाला. शाहरुखला जखमी अवस्थेत सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे शाहरुखचा मृत्यू झाला. पहाटे पाचच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी ही माहिती सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली.
खुनाचा प्रयत्नप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा
पोलिसांवर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाहरुख शेख आणि त्याची पत्नी नफिसा यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
शरण येण्याचे आवाहन
पोलिसांचे पथक शाहरुख शेखला पकडण्यासाठी लांबोटी गावातील त्याचे नातेवाईक राजू शेख याच्या घरी पहाटे पोहोचले. पोलिसांनी शाहरुखला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने त्याच्याकडील पिस्तूल पोलिसांवर रोखले. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्या वेळी खोलीत तीन लहान मुले होती. शाहरुखने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला पुन्हा शरण येण्याचे आवाहन केले. घरात लहान मुले असल्याने गंभीर घटना घडण्याची शक्यता होता. पोलिसांच्या पथकाने प्रसंगावधान राखून प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात शाहरुख जखमी झाला.