पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बेकायदा प्रवेश करून गोंधळ घातल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या दोन कार्यकर्त्यांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. दोघांना न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बेकायदा प्रवेश करून प्राचार्यांच्या दालनात गोंधळ घातल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रशांत दुर्गाप्रसाद कनोजिया (वय ५०, रा. श्रीपाद अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि विक्रांत वसंत भिलारे (वय ४०, रा. न्यू अक्षय सोसायटी, कोरेगाव पार्क) यांना अटक करण्यात आली. याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र काशीराम पाटील (वय ५२, रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली.

मनसे कार्यकर्त्यांनी बेकायदा प्रवेश करून गोंधळ घातला. संस्थेच्या आवारात घोषणाबाजी केली. प्राचार्यांच्या दालनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटविली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात कनोजिया आणि भिलारे यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.

या प्रकरणातील अन्य आरोपींची नावे निष्पन्न करायची आहे. आरोपींचे मोबाइल संच जप्त करायचे आहे. तपासासाठी त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील शीला घोडेस्वार यांनी युक्तिवादात केली. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. अमेय बलकवडे, ॲड. मुकुल महिंद्रकर, ॲड. अमृता मुळे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने कनाेजिया आणि भिलारे यांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.