पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून आलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक प्रदीप माने आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख-जाधव या दोघांनाही पक्षाचा ‘एबी फॉर्म’ देऊन राजकीय ‘खेळी’ केली आहे. शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील शिवसेनेतच बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांना अधिकृत ‘एबी फाॅर्म’ दिल्यानंतर चिवटे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी याच मतदारसंघातून शिवसेना (शिंदे) नेते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी स्वीय सहाय्यक सचिन सानप यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तसेच शिवसेनेच्या पुणे शहर सह संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत यांनीही अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेसकडून शिक्षक मतदारसंघासाठी विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे ती थांबविण्यासाठीचे प्रयत्न पक्ष पातळीवर सुरू झाले असून येत्या शुक्रवारी (९ ऑक्टोबर) अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधरसाठी भाजपकडून डाॅ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदार संघासाठी कौस्तुभ गावडे उमेदवार आहेत. या मतदारसंघासाठी हर्षदा देशमुख-जाधव यांनी सोमवारी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून प्रदीप माने यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या वेळी उपस्थित होते.

‘महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सर्व घटक पक्षांची चर्चा करून समन्वय साधून उमेदवारी अंतिम केली जाईल. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल,’ असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात शिवनसेनेत बंडखोरी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी शिक्षक मतदारसंघातून अर्ज दाखल केला. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असल्याचा दावा करून सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत यांनीही अर्ज दाखल केला. यापूर्वी सचिन सानप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे शिक्षक मतदारंसघातील बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे.

अखेरच्या दिवशी ५४ अर्ज

पदवीधर मतदारसंघासाठी अखेरच्या दिवशी ५४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत ८७ अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षक मतदारसंघात आज २९ अर्ज दाखल झाले असून एकूण अर्जांची संख्या ६७ वर गेली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे ती थांबविण्यासाठीचे प्रयत्न पक्ष पातळीवर सुरू झाले. दरम्यान, येत्या शुक्रवारी (९ ऑक्टोबर) अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदरासंघाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

बंडखोरी रोखण्याचे आव्हान

पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) सचिन बांगर, राणी खुर्दे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून भाजप उमेदवारापुढे अडचणीची स्थिती निर्माण केली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही शिवाजी खांडेकर यांनी पदवीधरसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांनी शिक्षक मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. निवृत्ती पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.