पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनात्मक नोंदणी केली आहे. या नोंदणीच्या आधारे लवकरच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महायुतीत पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची जागा कोण लढविणार याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. ते तिघे जो निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या दिशेने महायुतीचे कार्यकर्ते जातील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पिंपरीत व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी कासारवाडीत शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापौर रवी लांडगे यावेळी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, दोन विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामधल्या दोन, मराठवाड्यामधली एक अशा पाच मतदारसंघात विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनात्मक नोंदणी केली आहे. नोंदवलेले मतदार हे मतदान केंद्रापर्यंत कसे जातील, या संदर्भातले नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात ऑनलाइन बैठका झाल्या आहेत. या पाचही मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी झालेली आहे.

पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने दावा केला आहे. जागा वाटप कसे होणार आहे, याबाबत विचारले असता रवींद्र चव्हाण म्हणाले, जागावाटपा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील. या तिघांच्या नेतृत्वातले महायुतीचे सरकार हे राज्यामध्ये काम करत आहे. ही तिन्ही मंडळी या संदर्भातला जो निर्णय घेतात, त्या दिशेने महायुतीचे सर्व कार्यकर्ते जात असतात. त्यामुळे हे तिन्ही नेते जो निर्णय घेतील, त्या दिशेने महायुतीचे सर्व कार्यकर्ते जातील. या संदर्भातल्या सर्व निर्णयाची पार्लमेंटरी बोर्डामध्ये निश्चिती होत असते. त्यामुळे पार्लमेंटरी बोर्ड त्या संदर्भातले निर्णय घेईल.

सेवा संकल्प अभियानाचा आढावा

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु असलेल्या सेवा संकल्प अभियानाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर संघटनात्मक विषयांच्या संदर्भात एकत्र बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर शहरामध्ये माथाडीचा मेळावा आहे. निवडणुकीच्या नंतर काही प्रमुख पदाधिकारी यांच्या घरी प्रत्यक्षात भेटीला जाणे, असे नियोजन गेल्या काही दिवसांपासून ठरले होते. त्यामुळे अशा एकत्रपणे एक दिवस पिंपरी-चिंचवड मधील असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर संवाद करावा, त्या दृष्टिकोनातून आज पिंपरी-चिंचवडमध्ये बैठक होती आणि त्यामुळे आज या बैठकीला मी प्रत्यक्षपणे इथे उपस्थित राहिल्याचेही त्यांनी सांगितले.