पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा सोडावी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असताना, या मतदार संघात उमेदवारीसाठी दावा करण्याची तसदी न घेतल्याने काँग्रेसमधील निष्ठावंत पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाने कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांना उमेदवारी देऊन पक्षाचे अस्तित्त्व दाखवून दिले. मात्र, काँग्रेसने या जागेसाठी दावा का केला नाही, असा सवाल पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांना करण्यात आला आहे.

या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (१० ऑक्टोबर) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वीच काँग्रेसच्या नेते आणि काही पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आहे. पक्षाची ताकद असतानाही मतदार नोंदणीसाठी पक्षाने मागील वर्षभरात कोणताही ठोस उपक्रम राबविला नाही. तसेच उमेदवारीसाठी दावा न करता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला जागा बहाल करण्यात आली. त्यावरून काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याने काँग्रेसमधील नाराजी उफाळून आल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

काँग्रेसच्या नगरसेवकाला शिवसेनेची उमेदवारी

कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सुनील मोदी यांना शिवसेना (ठाकरे) पक्षाने उमेदवारी दिली आहे. स्वीकृत नगरसेवकाला पक्ष नसतो, असा दावा करत मोदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते तत्कालीन शिवसनेचे कोल्हापूरचे माजी शहरप्रमुख आहेत. मात्र, ते काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या जागेवरून स्वीकृत नगरसेवक झाले आहेत. त्यांना शिवसेनेेने उमेदवारी देऊन महाविकास आघाडी असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवाराच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेसने उमेदवारीसाठी दावा का केला नाही, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना केल्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले असल्याचे सांगण्यात आले.

‘राष्ट्रवादी’कडून दोन उमेदवार, काँग्रेस बघ्याच्या भूमिकेत

या मतदार संघात भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांना उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने या मतदार संघावर दावा न केल्याने प्रताप ऊर्फ भैया माने हे नाराज झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून ‘एबी फॉर्म’ मिळविला. मात्र, पहिला अर्ज हर्षदा देशमुख-जाधव यांनी भरल्यामुळे माने हे अपक्ष उमेदवार ठरले. आता त्यांनी या निवडणुकीत माघार घेतली आहे.‘राष्ट्रवादी’ दोन उमेदवार उभे करत असताना काँग्रेसने या जागेवर दावा करण्याचीही तसदी न घेतल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

‘राष्ट्रवादी’मुळे काँग्रेसवर नामुष्की

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा लढण्यासाठी तयारी सुरू केली होती. काँग्रेसचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, ऐनवेळी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे फिरली आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला देण्यात आली. त्यांनी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश आल्याने भाजपचे उमेदवार विक्रांत काकडे हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसवर नामुष्की ओढवली. आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठीही काँग्रेसने प्रयत्न न केल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

आजच्या बैठकीत चर्चा

या मतदार संघाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेस भवन येथे शनिवारी (१० ऑक्टोबर) बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.