पुणे : ‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालातून राज्यातील आणि केंद्रातील सत्तेविरोधात जनमत असल्याचे दाखवून देण्याची संधी आहे. ही निवडणूक उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांच्या संपर्काची आहे. नोंदणी केलेल्या मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची राहणार आहे. त्यासाठी मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात चिकाटीने आणि पक्षीय राजकारण न आणता काम करावे,’ असा कानमंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना दिला.
महाविकास आघाडीच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार, विद्यमान आमदार जयंत आसगावकर (काँग्रेस) यांच्या प्रचारार्थ पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे डाॅ. विश्वजित कदम, माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आणि विशाल तांबे यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते.
‘सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला निश्चित यश मिळेल. देशातील आणि राज्यातील परिस्थिती वाईट झाली आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. भाजपकडून दिवास्वप्ने दाखविली जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित काम केले, तर दोन्ही उमेदवारांचा विजय नक्की आहे,’ असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, ‘भाजपच्या पायाखालील वाळू सरकली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले, तर विजय होणार आहे. देशातील बदललेल्या वातावरणाचा अंदाज सुशिक्षित मतदारांना आहे. सरकराच्या विरोधात जनमत आहे हे या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दाखवून द्यावे लागेल.’
‘पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, हा भाजपचा अहंकार या निवडणुकीत उतरवण्याची वेळ आली आहे. लोकशाहीत मते विकत घेता नाही हे दाखवून देऊन महाविकास आघाडीच्या पाचही उमेदवारांना विजयी करावे,’ असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
शरद पवार यांचे मार्गदर्शन
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ऑनलाइन उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘हर्षदा देशमुख-जाधव यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. मागील दहा-बारा वर्षांपासून त्या समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणाची जाण, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पुरोगामी विचारांचा वारसा त्या सक्षमपणे चालवतील, याची खात्री आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यामुळे त्यांना समाजकारणाची ओढ लागली. पदवीधरांचे प्रश्न त्या विधिमंडळात प्रभावीपणे मांडतील. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील असा मला विश्वास आहे.’
