पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवारांच्या विरोधात महायुतीतील घटक पक्षांमधून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, बंडखोरी रोखण्याचे आव्हान महायुतीसमोर उभे राहिले आहे. महायुतीतील कोणत्याही इच्छुकाने बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्याने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर महायुतीतील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचवेळी शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांना रविवारी भाजपकडून अधिकृत अर्ज देण्यात आले. हे दोघेही आज‚ सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच महायुतीतील बंडखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत पक्षाच्या संघटनात्मक ताकदीबरोबरच स्थानिक पातळीवरील समीकरणे, इच्छुकांची संख्या आणि घटक पक्षांमधील समन्वय यांना महत्त्व असते. त्यामुळे अधिकृत उमेदवार निश्चित झाल्यानंतरही इच्छुकांकडून स्वतंत्रपणे अर्ज दाखल होऊ नयेत, यासाठी महायुतीच्या नेत्यांना समन्वयाची भूमिका घ्यावी लागणार आहे.
‘महायुतीमध्ये बंडखोरी होऊ देणार नाही. कोणी उमेदवारी अर्ज भरला तरी त्याने माघार घ्यावी यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत महायुतीतील संभाव्य नाराजांची मनधरणी केली जाण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये प्रवेशापूर्वी उमेदवारी
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या नावाची घोषणा रविवारी दुपारी केली. त्यानंतर पुणे शहर भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आधी उमेदवारीची घोषणा आणि त्यानंतर पक्षप्रवेश असा राजकीय घटनाक्रम या निवडणुकीत पाहायला मिळाला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच पक्षप्रवेश आणि एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याने भाजपने निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांमधील इच्छुकांना अधिकृत उमेदवारांच्या विरोधात जाण्यापासून रोखणे हे नेतृत्वापुढील महत्त्वाचे आव्हान राहणार आहे. महायुतीतील अधिकृत उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत कोणते इच्छुक स्वतंत्रपणे अर्ज दाखल करतात आणि त्यानंतर माघारीच्या कालावधीत कोणत्या पातळीवर समन्वय साधला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
