पिंपरी : ‘पक्ष म्हणून आपण सगळे मेहनत घेतो, कष्ट करताे, आमचे कष्ट आम्ही दर वेळेला दुसऱ्याच्या ओंजळीत का टाकायचे? यामुळेच पुणे पदवीधर मतदार संघात उमेदवार द्यावा, असा पक्षप्रमुखांकडे आग्रह केला. त्यानुसार सुनील माेदी यांना उमेदवारी देण्यात आली,’ असे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना  (ठाकरे) पक्षाचे उमेदवार मोदी यांच्या प्रचारार्थ बुधवारी पिंपरीत झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अंधारे बाेलत हाेत्या. उमेदवार सुनील माेदी, शहरप्रमुख चेतन पवार, पिंपरी-चिंचवड सहसंपर्क प्रमुख गाैतम चाबुकस्वार, निवडणूक प्रभारी अशाेक वाळके,   उपजिल्हा प्रमुख राेमी संधू, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, भाेसरी विधानसभा प्रमुख अनिल साेमवंशी, समन्वयक कैलास नेवासकर, संघटक अमाेल भालेकर, महिला आघाडीच्या सुशिला पवार, वैभवी घाेडके यावेळी उपस्थित हाेते.

‘पदवीधरची निवडणूक किचकट आणि जटिल समजली जाते. परंतु, यापूर्वीही शिवसेनेने अशा निवडणुका जिंकल्या आहेत. मुंबईमध्ये सिनेटच्या दहाही जागा निवडून आणल्या आहेत. भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तसेच, ज्या निवडणुका बॅलेट पेपरवर होत आहेत, त्या निवडणुका शिवसेना जिंकते. त्यामुळे बॅलेट पेपरवर असणारी पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे,’ असा विश्वास अंधारे यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अतिशय सूक्ष्म नियाेजन केले असून, जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पाेहोचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

झेनजीने सत्ताधाऱ्यांचा माज पायदळी तुडवला

तरुणाईचे प्रश्न, पेपरफुटी, परिक्षांचा मुद्दा याविराेधात आपण लढा देत आहाेत. भलेभले करोडपती, अब्जपती, मोठ-मोठे नेते, मंत्री-संत्री मोदी, शहाच्या विरोधात बोलायला घाबरत होते, दचकत होते, तिथे झेनजीने या सगळ्या सत्तातुरांचा सगळा तुरा तोडून मोडून काढलाय. सत्ताधा-यांचा माज पायदळी तुडवलाय. देशभरात जेनझीचे लोन पसरले आहे. त्यामुळे तरूण, पदवीधरांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढा देत असतानाच पदवीधर मतदारसंघातून आमचा प्रतिनिधी सभागृहात पाठवणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदार संघात निश्चितच बदल हाेणार, असा विश्वासही अंधारे यांनी व्यक्त केला.

पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रश्न आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा विषय, या विषयावर आपण निवडणूक लढवत आहाेत. माझ्यासमाेर जे दोन उमेदवार आहेत, ते कुणाच्यातरी घराण्यातून, कुठल्यातरी शिक्षण संस्थेमधून आलेले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून ४० वर्षांपासून रस्त्यावरची लढाई लढत आहे. त्यामुळे मला प्रश्नाची जाणीव आहे. पदवीधर निवडणूक थाेडी तांत्रिक असल्याचे सुनील माेदी यांनी सांगितले.