Pune Traffic Update / पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’च्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी (२१ जानेवारी) शहरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. लष्कर भागातील लेडीज क्लब येथून सायकल स्पर्धोचा प्रारंभ होणार आहे. नांदेड सिटी येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे.

‘लष्कर भागातील लेडीज क्लब परिसरातील तारापोर रस्ता स्पर्धेचा प्रारंभ होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. स्पर्धा मार्गस्थ झाल्यानंतर विविध रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणार आहे. सायकल स्पर्धेतील स्पर्धक मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहे’, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमा शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील या वेळी उपस्थित होते.

’दुपारी बारा ते चारपर्यंत टप्याटप्याने रस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. काही रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. कोणताही रस्ता अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बंद करण्यात येणार नाही, असे त्यांनी नमूद केले. दुसऱ्या टप्यातील स्पर्धेचा मार्ग पुढीलप्रमाणे – लेडीज क्लब – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक- गाेळीबार मैदान चौक- शीतल पेट्रोल पंप चौक- खडी मशीन चौक- किरकिटवाडी -नांदेड सिटी,

वाहतुकीस बंद असणारे रस्ते

  • ब्लू नाईल हाॅटेल ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
  • डाॅ. आंबेडकर पुतळा ते खाण्या मारुती चौक (महात्मा गांधी रस्ता)
  • सोलापूर बाजार ते नेपीयर रोड, नेपीयर रोड ते गोळीबार मैदान चौक
  • गोळीबार मैदान ते लुल्लानगर चौक
  • कोंढवा ज्योती हाॅटेल चौक ते खडी मशीन चौक
  • येवलेवाडी ते बोपदेव घाट
  • खडकवासला ते सिंहगड रस्ता
  • किरकिटवाडी ते नांदेड सिटी परिसर
  • नवले पूल ते नांदेड सिटी प्रवेशद्वार

लष्कर भागातील शाळा बंद

स्पर्धेचा प्रारंभ दुपारी बाराच्या सुमारास होणार आहे. लष्कर भागातील शाळांना बुधवारी प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.