पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. देश-विदेशातून आलेल्या सायकलपटूंचे टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केले. रस्ते बंद असल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. मात्र, त्याचा परिणाम नागरिकांच्या उत्साहावर झाला नाही. गल्लीबोळात गाड्या लावून मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या स्पर्धेचा आनंद नागरिकांनी लुटला. या वेळी चर्चा झाली, ती एरव्ही पुणेकरांच्या वाट्याला कधीही न येणाऱ्या पण स्पर्धेमुळे पाहायला मिळालेल्या चकाचक, गुळगुळीत, प्रमाणबद्ध आणि दर्जेदार रस्त्यांची!

चकचकीत रस्ते, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ देश-विदेशातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली. स्पर्धेचा थरार मोबाईलच्या कॅमेरात टिपण्यासाठी तरुण-तरुणी हात उंचावत होते. लहानग्यांना खांद्यावर घेऊन पालकांनी स्पर्धेचा आनंद टिपला. सुट्टी मिळाल्याने कामगारवर्गही सायकलपटूंच्या स्वागतासाठी आनंदाने सहभागी झाला होता.

या स्पर्धेनिमित्त चकाचक झालेल्या रस्त्यांची चर्चाही पुणेकरांमध्ये रंगली. हे रस्ते असेच राहतील का, आता लगेच खोदकाम नाही ना करणार, इतर ठिकाणी असे रस्ते कधी होणार, चांगल्या रस्त्यांसाठी एखादी स्पर्धाच घ्यावी लागणार का, आता नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक हे रस्ते असेच स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतील का, असा एक ना अनेक सवाल पुणेकरांनी आपापसात बोलताना उपस्थित केले.

‘चांगले रस्ते देणे सरकारचे कर्तव्यच आहे. स्पर्धेमुळे किमान चांगले रस्ते करण्याची क्षमता आपल्यात आहे, याची जाणीव झाली, हेही नसे थोडके. सरकारने असेच रस्ते साऱ्या पुण्यात बनवावेत आणि सततची खोदकामे बंद करावीत. विकासासाठी चांगले रस्ते असणे महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रिया स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित एकाने दिली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथून सुरू झालेला अंतिम टप्पा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, भक्ती-शक्ती चौक, नळ स्टॉप, सेव्हन लव्हज चौक, नॅशनल वॉर मेमोरियल, शनिवारवाडा, साखर संकुल, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरून बालगंधर्व रंगमंदिर येथे समारोपाला पोहोचला. या अंतिम टप्प्यात दोन्ही शहरांतील सुमारे १४ लाख नागरिकांनी तब्बल ९९.१५ किलोमीटरच्या मार्गावर दुतर्फा उभे राहून देश-विदेशातून आलेल्या सायकलपटूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे स्वागत जागतिक सायकल स्पर्धांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला असून, नागरिकांच्या सहभागाच्या दृष्टीने नवा उच्चांक प्रस्थापित झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला.

भारतीय उपखंडात ‘स्टार स्पोर्ट्स’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर, तर युरोपसह जगातील ७० हून अधिक देशांमध्ये ‘एचबीओ मॅक्स’ आणि ‘डिस्कवरी प्लस’ या आंतरराष्ट्रीय माध्यमांद्वारे स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, विस्तीर्ण व सुशोभित रस्ते, ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा, मराठी नाटक व संगीत परंपरा, क्रीडा संस्कृती, पर्यावरणपूरक उपक्रम आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे दर्शन घडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

शिकवणीला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र, रस्ते बंद असल्यामुळे रिक्षा मिळत नव्हत्या. त्यामुळे उशीर झाला आणि प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागले. काही कारणांमुळे जास्त वेळ चालता येत नव्हते. त्यात रस्ते बंद असल्यामुळे बरेच अंतर चालावे लागले. मात्र, स्पर्धेमुळे रस्ते चकाचक झाले. पुण्याचे नाव जगभरात पोहचले. त्यासाठी एका दिवसाचा त्रास सहन करणे शक्य होते. पुढच्या वर्षी यावरही मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. – पूर्वजा देशपांडे, आनंदनगर

सायकलपटू रस्त्यावरून अतिशय वेगाने गेले. काही क्षणांचा हा अनुभव अविस्मरणीय होता. सायकल स्पर्धेमुळे रस्त्यांवर गाड्या नव्हत्या. पण, स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली होती. नागरिकांच्या उत्फूर्त प्रतिसादाने वातावरणात ऊर्जा संचारली होती. – अभिजित जावळकर, हिंगणे

‘पुणे ग्रँड चॅलेंज-२०२६’च्या निमित्ताने खेळाला पाठबळ मिळते आहे, याचा आनंद आहे. त्यानिमित्ताने रस्ते चकाचक झाले. आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. मात्र, हे केवळ स्पर्धेपुरते न राहता, इतर वेळीही पायाभूत सुविधांची देखभाल घ्यायला हवी. – कौस्तुभ कंधारकर, हिंजवडी