Pune Grand Cycle Tour : पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ पार पडत आहे. पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी या दरम्यान पार पडत आहे. ही स्पर्धा पार पडत असताना आज काही सायकलस्वारांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील मुळशी-कोळवण येथील रस्त्यावर हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. येथील रस्ता अरुंद असल्याने रस्त्याचा सायकलस्वारांना अंदाज न आल्याने ही घटना घडली. या घटनेत ५० पेक्षा जास्त सायकलस्वार जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओत काय?
पुणे ग्रँड सायकल टूरमधील काही सायकलस्वार एकापाठोपाठ एक असे एकमेकांवर आदळल्यांचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. ही घटना घडल्यानंतर काही सायकलस्वार ट्रॅक सोडून बाजूला फेकले गेल्याचं दिसत आहे. या घटनेत काही सायकलस्वार जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत त्यांना मदत केली. या घटनेत काही सायकलस्वारांना दुखापत झाली.
या सायकलस्वारांकडे असलेल्या काही महागड्या सायकलींचं देखील या घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. मात्र, या अपघाताच्या घटनेमुळे या सायकलिंग स्पर्धेच्या मार्गाच्या नियोजन आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुणे ग्रँड सायकल टूरमधील काही सायकलस्वारांचा अपघात झाल्यानंतर लगेच मार्गावर तैनात असलेले वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचले आणि जखमी झालेल्या सायकलस्वारांना प्रथमोपचार देण्यात आले. तसेच ज्या सायकलस्वारांना जास्त दुखापत झाली, त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
