पुणे : पुणे शहरात जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या १३६ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गावर विविध यंत्रणांकडून सुरू असलेली खोदाईची कामे येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिले आहेत.
सायकल स्पर्धा नियोजनाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ज्या मार्गावर स्पर्धा होणार आहे, अशा सुमारे १३६ किलोमीटरच्या मार्गावर पाणीपुरवठा, मलनिस्सारण, महावितरण, गँस कंपनी, आय-ट्रिपल-सी, पोलिसांचे सीसीटीव्ही यांसह विविध यंत्रणांकडून सुरू असलेली खोदाईची कामे येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पावसकर यांनी दिले आहेत.
‘पुणे ग्रँड टूर सायकल’ स्पर्धेच्या आयोजनासाठी महापालिकेत शहर अभियंता पावसकर यांनी बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक विभाग) मनोज पाटील, महापालिकेचे पथ विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश बनकर तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ३१ ऑक्टोबरनंतर स्पर्धेच्या मार्गावर कोणालाही खोदकामाची परवानगी दिली जाणार नसल्याचे पावसकर यांनी सांगितले.
स्पर्धेच्या मार्गिकेवरील रस्ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. सायकल स्पर्धेच्या मार्गिकेवर विविध सेवा वाहिन्यांसाठी सुरू असलेल्या खोदकामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये एमएनजीएल, एमएसडीसीएल, दिनेश इंजिनिअरिंग, सीसीटीव्ही अॅलाइड कंपनी, महापालिकेच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि विद्युत विभागाच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पावसकर यांनी सांगितले.
२५० पेक्षा अधिक गतिरोधक हटविणार
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सायकलपटूंना सलग आणि गुळगुळीत पृष्ठभाग मिळावा यासाठी स्पर्धेच्या मार्गावरील सर्व गतिरोधक आणि उंचावलेले पादचारी मार्ग तात्पुरते हटविण्यात येणार आहेत. स्पर्धा होणार असलेल्या मार्गावर सुमारे २२५ ते २५० पेक्षा अधिक गतिरोधक आहेत. हे सर्व गतिरोधक काढून टाकले जाणार आहेत. ही स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर अपघाताचा धोका टाळण्यासाठी काढलेले गतिरोधक तातडीने पुन्हा बसविण्यात येणार असल्याचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
काही रस्ते नव्याने, काही दुरुस्त
ग्रँड टूरसाठी चार ‘पॅकेज’मध्ये सुमारे १३६ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यातील काही रस्ते नव्याने तयार केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या स्पर्धा मार्गावरील ५२ किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करण्यात येणार आहेत. यासाठी चार पॅकेज तयार करण्यात आली आहेत. त्याची कामे सुरू झाली आहे. यामध्ये रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण, चेंबरची पातळी रस्त्याशी समांतर करणे, पदपथांची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी नवीन पदपथ, तुटलेल्या दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगकामाचा समावेश आहे. भिंतींचे रंगकाम, सुशोभीकरण अशी कामेदेखील केली जाणार आहेत.
