पुणे : भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ भूवैज्ञानिकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर नामदेव धोटे (वय ५३, रा. संकेश्वर राॅयल सोसायटी, जाधववाडी, चिखली), कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका संदीपान घुले (वय ३९, रा. कुमार प्रिन्स व्हिला, जाधववाडी, चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना रात्री उशीरा अटक करण्यात आली. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल गरजेचा होता. संबंधित अहवाल मिळवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने भूजल सर्वेक्षण विभागात अर्ज केला होता. सुरुवातीला अहवाल देण्यासाठी बांधकाम व्यावासयिकाकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीत दोन लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून बांधकाम व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना धोटे आणि घुले यांना पकडण्यात आले.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करत आहेत.