पुणे : पुणे महानगराच्या पुढील २० वर्षांच्या नियोजित विकासासाठी ‘ग्रोथ हब’चा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुण्यात १८ ‘ग्रोथ सेंटर’ म्हणजेच विकास केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. प्रत्येक परिसरातील औद्योगिक परिसंस्था डोळ्यांसमोर ठेवून या केंद्रांचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात ही केंद्रे महानगरातील रोजगारनिर्मितीत वाढ करण्यासह आर्थिक विकासाला पूरक ठरणार आहेत.
नीती आयोग व राज्य सरकारच्या पुढाकाराने ‘पुणे ग्रोथ हब’चा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून पुणे महानगराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’च्या मदतीने केले जात आहे. सध्या हा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारने पुणे महानगराच्या विकासासाठी पुढील पाच वर्षांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पुणे परिसरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. याअंतर्गत प्राधान्यक्रमावरील प्रकल्प निश्चित करण्याचे पाऊल प्रशासनाकडून उचलण्यात आले आहे.
या विषयी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ‘ग्रोथ हब’च्या विकास आराखड्याचा मसुदा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील १८ महिन्यांत या आराखड्याला अंतिम रूप दिले जाईल. या आराखड्यात पायाभूत सुविधा केंद्रस्थानी ठेवून विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. याचबरोबर रस्त्यांचे जाळे, वाहतुकीच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर दिला जाईल. पुणे महानगरात १८ विकास केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. मेट्रो स्थानकांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी ही केंद्रे विकसित केली जातील. प्रत्येक परिसरातील औद्योगिक परिसंस्था डोळ्यांसमोर ठेवून या केंद्राची रचना केली जाईल.’
पुणे ग्रोथ हब
पुणे महानगराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘ग्रोथ हब’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नीती आयोगाने मुंबईचा आर्थिक विकास आराखडा तयार केला होता. त्याच धर्तीवर ‘ग्रोथ हब’अंतर्गत पुण्याचा आर्थिक विकास आराखडा तयार केला जात आहे. यात पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे, जिल्हा आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्र असून, एकूण सहा हजार ९१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १५ ते १८ लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात चाकण, तळेगाव, रांजणगाव पट्ट्यातील निर्मिती क्षेत्रासह भविष्यातील नवीन उद्योगांचाही विचार करण्यात येणार आहे. त्यात कृत्रिम प्रज्ञा (एआय), सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहने ही क्षेत्रे केंद्रस्थानी असतील.
संतुलित विकास साधणार
पुणे महानगरात १८ विकास केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. व्यवसाय केंद्रे आणि औद्योगिक केंद्रे म्हणून त्यांचा विकास केला जाईल. मेट्रो स्थानकांचा परिसर आणि महत्त्वाच्या ठिकाणी ही केंद्रे असतील. त्यातून रोजगारनिर्मितीबरोबरच महानगराच्या संतुलित विकासाला गती मिळेल, असे डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.
