पुणे महानगराचा सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा, यासाठी ‘पुणे ग्रोथ हब’ अंतर्गत स्वतंत्र आर्थिक आराखडा तयार करण्याचे पाऊल गेल्या वर्षी पडले. राज्य सरकार आणि नीती आयोगाने हे काम हाती घेतले. आता पुण्याचा आर्थिक विकास आराखडा तयार झाला आहे. यात पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३६ पर्यंत २०० ते २२० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५८ प्राधान्य प्रकल्प, नऊ ते दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. या आराखड्यात पुण्याच्या विकासाला भविष्यात दिशा देणाऱ्या सहा क्षेत्रांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्यात उत्पादन, वाहन व विद्युत वाहननिर्मिती, अभियांत्रिकी वस्तू, संरक्षण-रोबोटिक्स- ड्रोन, इलेक्ट्रॉनिक्स -सेमीकंडक्टर आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांचा समावेश आहे.

उत्पादन क्षेत्रात पुणे आधीपासून अग्रेसर आहे. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, तळेगाव, रांजणगाव आणि खेडमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कंपन्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक उत्पादनाऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित उत्पादनाकडे आता हे क्षेत्र वळू लागले आहे. या क्षेत्रात पुरवठा साखळी, कुशल अभियंते, उच्च शिक्षण संस्था आणि सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांची परिसंस्था या गोष्टी पुण्याचे स्थान बळकट करणाऱ्या आहेत. आता या क्षेत्राच्या विस्तारामुळे निर्मिती क्षेत्रात पुण्याची आघाडी भक्कम होईल.

पुणे हे पूर्वीपासून वाहननिर्मितीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो हे देशातील दोन आघाडीचे उद्योगसमूह पुण्यात आधीपासून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, देशातील मर्सिडिज बेंझचा एकमेव उत्पादन प्रकल्प पुण्यात आहे. आता विद्युत वाहनांकडे कल वाढू लागला असून, त्यात वाहननिर्मिती क्षेत्रातील आधीपासून विकसित झालेली परिसंस्था या स्थित्यंतराला गती देत आहे. या क्षेत्रात नवतंत्रज्ञानाच्या दिशेने पडलेले अलीकडील पाऊल म्हणजे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू यांच्याकडून अत्याधुनिक बॅटरी संशोधन व विकास केंद्राच्या स्थापनेची घोषणा. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

अभियांत्रिकी वस्तू क्षेत्रातही पुण्याचे जागतिक पातळीवर नाव आहे. भोसरी, पिंपरी-चिंचवड, चाकण या पट्ट्यात प्रामुख्याने हे उद्योग आहेत. या उद्योगांकडून प्रामुख्याने विविध प्रकारची यंत्रे आणि उपकरणांची निर्मिती केली जाते. सरकारकडून उच्च तंत्रज्ञान अभियांत्रिकी पार्क प्रस्तावित असून, या क्षेत्राला भविष्याच्या दिशेने घेऊन जाणारे हे पाऊल आहे. संरक्षण, रोबोटिक्स व ड्रोन या क्षेत्रातही पुण्याची स्थिती चांगली आहे. महत्त्वाच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था, अभियांत्रिकी संस्था, अभियांत्रिकी कंपन्या, विद्यापीठे, उत्पादन क्षेत्र आणि नवउद्यमी असे काही मोजक्या शहरांमध्ये दिसणारे एकत्रित जाळे पुण्यात आहे. त्यामुळे संरक्षण उत्पादन खासगी क्षेत्रासाठी खुले झाल्यानंतर पुण्यासाठी आणखी संधी निर्माण झाल्या आहेत. त्यात विशेषकरून भारत फोर्जचा उल्लेख करावा लागेल. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरने (एमसीसीआयए) घेतलेला ड्रोन क्लस्टर उभारण्याचा निर्णय ड्रोननिर्मितीला बळ देणारा ठरणार आहे.

सेमीकंडक्टर क्षेत्रात ‘उणे’

इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात पुण्याची संमिश्र स्थिती आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती क्षेत्रात पुण्याची कामगिरी चांगली आहे मात्र, सेमीकंडक्टर क्षेत्रात अजून पाऊल पडलेले नाही. वेदांता-फॉक्सकॉनचा बहुचर्चित प्रकल्प पुण्यात तळेगावनजीक होणार होता. परंतु, तो गुजरातला हलविण्यात आल्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर सेमीकंडक्टर क्षेत्रात पुण्यात मोठी घडामोड झालेली नाही. सरकारकडून तळेगाव, रांजणगाव आणि खेडमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्राचे केंद्र विकसित करण्यात येत आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातही पुण्याने अजून फारशी प्रगती केलेली नाही. त्यामुळे या क्षेत्रात बराच पल्ला गाठावा लागणार आहे.

sanjay.jadhav@expressindia.com