पुणे : पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत पुढील ५ वर्षांत ५ हजार कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून सुरू करावयाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केल्या आहेत.

पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (पीएमआरडीए) अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, मॅकेन्झी कंपनीचे रौनक शहा आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरचे (पीआयसी) संचालक दिनानाथ खोलकर उपस्थित होते.

या बैठकीत पुणे ग्रोथ हब या संकल्पनेअंतर्गत नीती आयोगाला सादर करावयाच्या मसुद्याचे मॅकेन्झी कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तांनी पुणे परिसरातील आर्थिक वाढ, जीवनमान, गुणवत्ता व शाश्वत विकास या प्रमुख बाबी लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा सादर करण्याची सूचना केली. प्रकल्पांची यादी तयार करताना प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या वेळी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक प्रकल्पासाठी लागणारा अंदाजित खर्च व कालक्रम ठरवावा, अनेक प्रकल्पांना भूसंपादन आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत महानगर प्रदेशांच्या आर्थिक क्षमतेचा उपयोग करून उद्योग, रोजगार व गुंतवणूक वाढीस चालना आदी बाबींचा विचार करून बृहत आराखडा तयार करावा, अशी सूचना श्रावण हर्डीकर यांनी केली.

पुणे महानगर प्रदेश माहिती तंत्रज्ञान, वाहननिर्मिती उद्योग परिसंस्था, संशोधन संस्था, नवउद्यमी (स्टार्टअप) परिसंस्था यामुळे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या उपक्रमांतर्गत महानगर क्षेत्राच्या विकासासह सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ करणे आणि मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे, असे अभिजित चौधरी यांनी सांगितले.

ग्रोथ हबमधील महत्त्वाची क्षेत्रे

  • माहिती तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • पर्यटन
  • जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी)
  • उत्पादन
  • हरित ऊर्जा

पुणे ग्रोथ हब

एकूण क्षेत्रफळ – ६ हजार ९१४ किलोमीटर

समाविष्ट भाग – पुणे महानगर क्षेत्र, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा