राज्यात सगळीकडेच गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यात मागच्या आठवड्यात धरणाचे पाणी सोडल्यामुळे सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यानंतर नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याप्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना महत्त्वाचा इशारा दिला आहे.

धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू

अजित पवार यांनी एक्सवर सविस्तर पोस्ट लिहून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे.”

हे वाचा >> विश्लेषण: पुण्यात खडकवासला धरणाच्या बाबतीत नेमके काय घडले? धरणांतून विसर्ग कसा करतात?

पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

“धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानेही पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा >> “ते नसतानाही पुण्यात धरण वाहिलं”; पूरस्थितीवरुन राज ठाकरेंची अजित पवारांवर टीका

यासंदर्भात मी पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली असून त्यांना नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ ची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना संपूर्ण मदत, सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.