शासनाने कंपनीची काही जागा विकत घ्यावी; योग्य कार्यवाही होण्याचा शरद पवार यांचा विश्वास

िपपरीतील एचए कंपनीच्या प्रश्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले असून याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले असून ते लवकरच योग्य ती कार्यवाही करतील, असा विश्वास ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी भोसरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पवार म्हणाले,की पंतप्रधानांकडे काल दिल्लीत बैठक झाली. अर्थमंत्री अरूण जेटली व मी उपस्थित होतो. तेव्हा पंतप्रधानांपुढे असा प्रस्ताव ठेवला की, एचए कंपनीच्या मालकीच्या एकूण जमिनीपैकी सुमारे १५ ते २० एकर जमीन राज्यशासनाने विकत घ्यावी आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून कंपनीचे प्रश्न मार्गी लावावेत. गरिबांना, कामगारांना परवडतील अशी घरे बांधावीत. पंतप्रधान मोदी यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला व त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनीही तयारी दर्शवली. एचए कंपनी चालवण्यासाठी या माध्यमातून भांडवल उपलब्ध होईल. बँकेची देणी कंपनीला फेडता येतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामगारांचा गेल्या २१ महिन्यांचा पगार देता येईल.

मोदी यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले असल्याने ते योग्य ती कार्यवाही करतील, असा विश्वास वाटतो. श्रीरंग बारणे, अमर साबळे व मी आम्ही तिघे खासदार या नात्याने या विषयाचा पाठपुरावा करत आहोत. याप्रकरणी आवश्यक ती सर्व मदत करू. कोणत्याही प्रकारचे राजकारण यामध्ये आणण्याचा विचार आमच्या मनात नाही, असे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

जमीन विकण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. कामगारांना दिलासा देण्याची गरज आहे. कामगारांचा २१ महिने तर अधिकाऱ्यांचा २३ महिने पगार नाही. याबाबतचा निर्णय लवकर व्हावा आणि त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी.

– अरूण बोऱ्हाडे, कामगार प्रतिनिधी, एचए कंपनी