पुणे : व्याजाच्या तगाद्यामुळे व्यावसायिकाने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
श्रीकांत सुरेश जाधव (वय ३८, रा. मगर आळी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी धनश्री (वय ३७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांचा पोर्क विक्रीचा व्यवसाय आहे. हडपसर भागात त्यांचे दुकान आहे. मार्च २०२६ पासून आरोपीकडून जाधव पोर्क खरेदी करत होते. या व्यवहारातील पैसे राहिल्याने आरोपींनी जाधव यांच्याकडे व्याजाने पैसे परत करण्याची मागणी केली. उधारीवरील पैसे व्याजासह परत केल्यानंतर आरोपींनी जाधव यांच्याकडे पुन्हा पैसे मागितले. पैसे न दिल्यास दुकान ताब्यात घेऊ, अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली.
एका आरोपीने २५ जुलै रोजी जाधव यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. जाधव यांचे दुकान बेकायदा ताब्यात घेतले. दुकानाला कुलूप लावून बदनामी केली. आरोपींच्या त्रासामुळे २ ऑगस्ट रोजी जाधव यांनी दुकानाच्या छताला ओढणी बांधून गळफास घेतला. पोलीस उपनिरीक्षक शिवशांत बिराजदार तपास करत आहेत.
धमकीमुळे तरुणाची आत्महत्या
समाजमाध्यमात चित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव भागात घडली. किशाेर अनिल कंकाळे (वय ३०, रा. आदर्शनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि किशोर ओळखीचे आहेत. आरोपीने किशोरची मोबाइलवरून चित्रफित काढली. ती समाज माध्यमांत प्रसारित करण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे किशोरने ९ ऑगस्ट रोजी दुपारी लोहगावमधील मित्राच्या सदनिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी किशोरने आरोपी त्रास देत असल्याची माहिती मेव्हण्याला दिली होती.
