पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४२ वर्षीय आरोपी मुंढव्यातील कीर्तनेबाग परिसरात राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय पीडित महिलेची आरोपीशी तीन वर्षांपूर्वी एका विवाहविषयक संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने महिलेशी संपर्क साधला आणि विवाह करण्याबाबत उत्सुक असल्याचे सांगितले. विवाहाचे आमिष दाखवून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याने विवाहास नकार दिला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करत आहेत.

महिलांची फसवणूक करण्याच्या घटना

विवाहविषयक संकेतस्थळावरुन आमिष दाखवून महिलांची फसवणूक, तसेच बलात्कार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. महिला्ंकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जाते. बिबवेवाडी भागातील एका डाॅक्टर तरुणीची विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर महिलेने दवाखान्यात विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केली होती .विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी करताना महिलांनी खातरजमा करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग

बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोरेगाव पार्क भागातील एका बँकेत घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँक कर्मचारी महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोरेगाव पार्क भागताील एका बँकेत कर्माचारी आहे. आरोपी शेख हा बँकेत सोमवारी ( ६ एप्रिल) दुपारी पावणेएकच्या सुमारास व्यावसायिक कर्ज मिळवण्याबाबतची कागदपत्रे घेऊन बँकेत आला होता. बँकेचे लेखापरीक्षण सुरू असल्याने बँक कर्मचारी महिलेने शेख याला थांबण्यास सांगितले. या कारणावरुन शेखने महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला, तसेच महिलेला धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी घटनास्थळी भेट दिली . पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.