पुणे : दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन महिलेवर बलात्कार करणारा भोंदू ऋषीकेश वैद्य याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळून लावला. ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वैद्य हा मूळचा वसईचा असून, त्याची महिलेशी ओळख झाली होती. दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी त्याने महिलेकडे केली होती.
महिलेला जाळ्यात ओढून त्याने बलात्कार केला. त्यानंतर महिलेने २७ मार्च रोजी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी वैद्यला अटक केली. या प्रकरणात वैद्य न्ययालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहे. न्यायालयीन कोठडीत असताना वैद्य याने जामीन मिळवण्यासाठी वकिलांमार्फत अर्ज केला. सरकारी वकील लीना पाठक, तसेच पीडित महिलेचे वकील रोहन नहार यांनी वैद्य याच्या जामीन अर्जास विरोध केला. ‘वैद्य याने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन महिलेवर बलात्कार केला.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप आरोपपत्र दाखल झाले नाही. आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येऊ नये’, अशी विनंती ॲड. पाठक आणि ॲड. नहार यांनी युक्तिवादात केली. या प्रकरणात फिर्यादी महिलेचे वकील ॲड. नहार यांना ॲड. ओंकार फडतरे, ॲड. गायत्री पोटवडे, ॲड. चैतन्य अभंग यांनी सहाय केले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने वैद्य याचा जामीन अर्ज फेटाळला.
अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच तक्रार
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. महिलेची भोंदू ऋषीकेश वैद्य याची समाज माध्यमातून ओळख झाली होती. दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन वैद्य याने महिलेवर बलात्कार केला होता. सुरुवातीला या प्रकरणात महिलेने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संबंधित गुन्हा माणिकपूर पोलिसांनी तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केला होता.
