पुणे : क्रेडीट कार्डवरुन घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने वसुलीसाठी आलेल्या एका खासगी बँकेच्या वसुली एजंटांनी तरुणाला शिवाीगाळ करुन दांडक्याने मारहाण केली. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी वसुली करणाऱ्या एजंटाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

जय सुहास कासार (वय २६), विनीत सुहास कासार (वय ३०, दोघे रा. घावटेनगर, मांजरी, हडपसर), तनिष्क हरीष खुडे (वय १९, रा. कोद्रेनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय तरुण एका खासगी ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करत आहे. त्याने एका खासगी बँकेकडून क्रेड़ीट कार्डवरुन कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकले होते. हप्ते वसुलसाठी जय कासार आमि साथीदार फिर्यादी काम करत असलेल्या ठिकाणी २७ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास आले. आरोपींनी तुमची बदनामी करतो, असे सांगितले.

त्यानंतर तरुणाला धमकावून त्यांनी कर्जापेक्षा जास्त रक्कमेची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर तिघांनी त्याला शिवीगाळ करुन दांडक्याने मारहाण केली. आरोपी एका महिलेसमोर फिर्यादीला मारहाण करत होते. महिला पोलीस कर्मचारी आहे. तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या तावडीतून पोलीस कर्मचारी महिलेने तरुणाला सोडविले. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करत आहेत.

वसुली एजंटांची झाडाझडती

वसुली एजंटांकडून मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. या घटनेची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेतली.

वसुलीच्या नावाखाली मारहाण करुन धमकाविणाऱ्या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले, तसेच वसुली करणाऱ्या एजंटांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.