पुणे : लहान मुलांमध्ये क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ‘क्रीडा नर्सरी’ प्रकल्प उभारला जाणार आहे. हडपसर येथील मगरपट्टा रस्त्याच्या जवळ असलेल्या आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून ११ कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
‘या प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पात टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,’ अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. हडपसर भागातील सुमारे १० हजार ४४१ चौरस मीटर क्षेत्रफळावर हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. क्रीडा विभागाच्या मागणीनुसार महापालिकेच्या पॅनलवरील आर्किटेक्टकडून नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार स्थापत्य व विद्युत विषयक कामे हाती घेतली जाणार आहेत.
या क्रीडा नर्सरी प्रकल्पाचा मुख्य उद्देश ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे, मैदानाशी नाते जोडणे आणि विविध क्रीडा प्रकारांची ओळख करून देणे हा आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, २०० मीटर धावपट्टी, टेबल टेनिस, रोलर स्केटिंग, बॅडमिंटन, लॉन टेनिस, ओपन जिम आदी सुविधांचा समावेश असणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून, सन २०२६-२७ मध्ये ४ कोटी, २०२७-२८ मध्ये ४ कोटी आणि २०२८-२९ मध्ये ३.६१ कोटी रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा नर्सरी सुविधांसाठी एक कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्पाचा एकूण खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कलम ७२ ब नुसार पुढील वर्षांच्या अंदाजपत्रकांमध्ये आवश्यक निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
क्रीडांगणे आणि क्रीडा संकुल यांची निर्मिती
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलांमध्ये मोबाईल, टीव्ही तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट यांच्या वापराचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. शाळेतून घरी आल्यानंतरही बहुतांश मुले ही मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेली दिसतात. लहान मुलांना खेळण्यासाठी आवश्यक क्रीडांगणे तसेच क्रीडा संकुले उपलब्ध नसल्याने शारीरिक खेळ मुलांना खेळता येत नाही.
त्यामुळे मुलांची शारीरिक जडणघडण देखील योग्य पद्धतीने होत नसल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी अधिकाधिक चांगले उपक्रम राबवून त्यांना खेळण्यासाठी क्रीडांगणे तसेच क्रीडा संकुले उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
