पुणे : कबुतर चोरीच्या संशयावरुन तरुणाला बॅटने मारहाण करुन खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.रुपेश धनराज शिंदे (वय १९, रा. बोराटे वस्ती, मोशी, पिंपरी-चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव अहे. याबाबत रुपेशचे वडील धनराज यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश शिंदे आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हडपसर परिसरातून दुचाकीवरुन निघाले होते.
हडपसरमधील शंकर मठ परिसरातील कबुतराच्या ढाबळीजवळ थांबले होते. त्या वेळी तेथे असणारे श्वान भुंकू लागले.भुंकण्याचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात राहणाऱ्या पाच आरोपींनी रुपेश आणि त्याचा मित्र अजय यांना हटकले. दोघे जण तेथून पळाले. तेव्हा टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. पळताना रुपेश रस्त्यावर पडला. तेव्हा आरोपींनी त्याला बॅटने, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत रुपेश जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील रुपेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कबुतर चोरीच्या संशयावरुन टोळक्याने रुपेशला मारहाण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर खूनामागचे नेमके कारण समजू शकेल’, अशी माहिती परिमंडळ पाचच्या पोलीस निरीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिली.
हळदीच्या पाकिटात गांजा लपवून विक्री , बाणेर पोलिसांकडून दोघांना अटक
हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १६ किलो गांजासह परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे (दोघे रा. पिंपरी-चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी बोरसे हे शहराच्या वेगवेगळ्या भागात गांजा विक्री करत होते. संशय येऊ नये म्हणून ते गांजा हळदीच्या पाकिटात लपवून विक्री करत होते. गांजा विक्रीबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून दोघे जण एका खासगी कंपनीत काम करत होते. बाणेर परिसरात दोघे जण दुचाकीवरुन येणार असून, ते गांजा विक्री करणार असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले.
पोलिसांनी दोघांची झडती घेतली. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत हळदीची पाकिटे सापडली. तपासणीत पाकिटात गांजा लपविल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन किलो गांजा जप्त केला. आरोपी बाेरसे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघांनी पिंपरी-चिंचवडमधील घरात गांजा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घराची झडती घेतली. घरातून पोलिसांनी १३ किलो गांजा जप्त केला. आरोपींनी गांजा कोठून आणला, तसेच ते कोणाला विक्री करणार होते ?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आठवडापूर्वी लोणी काळभोर भागात एकाकडून गांजा जप्त करण्यात आला होता.
