पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बहुचर्चित ‘उच्च क्षमता अंतर्गत वर्तुळाकार मार्ग’ (एचसीएमटीआर) प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले. यासाठी पुढील तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
हा मार्ग तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष आग्रही असून, त्यासाठी पुण्यासह मुंबईमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. हा प्रकल्प तातडीने मार्गी लागावा, यासाठी या नियोजित प्रकल्पासाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. त्यानंतर प्रकल्पाचा डीपीआर तयार करून निविदा प्रक्रिया राबविली जाईल. या प्रकल्पासाठी चार टप्पे करण्यात येणार असून, दहा हजार कोटी रुपयांचा खर्च यासाठी होणार आहे.
शहराचा वाढता विस्तार आणि रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने १९८६ मध्ये शहरात ३६ कि.मी. लांबीचा एचसीएमटीआर हा उन्नत वर्तुळाकर मार्ग उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. हा मार्ग उभारताना अत्यंत कमी प्रमाणात जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा वेग वाढणार असल्याने महापालिका आयुक्त राम यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी साधारण १० हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यात खासगी भूसंपादनासाठी साधारण १ हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
‘एचसीएमटीआर’च्या जुन्या आराखड्यात तब्बल १२ ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. झोपडपट्टी, नदी आणि गर्दीच्या भागातून जाणारे काही प्रस्तावित मार्ग बदलल्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी तुलनेने सुलभ झाल्याचा दावा प्रशासनाने केला. या मार्गाचे चार टप्पे करण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या सल्लागाराला डीपीआर तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. ‘संपूर्ण ‘एचसीएमटीआर’चा एकत्रित डीपीआर तयार केला जाणार असला, तरी अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रत्येक पॅकेज स्वतंत्र तयार केले जाणार आहे,’ असे प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले.
भूसंपादन लवकर होण्याची शक्यता
‘एचसीएमटीआर प्रकल्पाच्या मार्गासाठी राज्य शासनाच्या आणि महापालिकेच्या जागा मोठ्या प्रमाणात असल्याने भूसंपादनाला फार कालावधी लागणार नाही. हा उन्नत मार्ग असल्याने राज्य सरकारच्या मालकीच्या जागांमधून हा रस्ता जात आहे. त्यासाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे.
यामध्ये विघ्न येऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक त्या सूचना राज्य सरकारच्या विविध विभागांना दिल्या आहेत. या मार्गामध्ये महापालिकेच्या हद्दीतून हा रस्ता जाताना वडगावशेरी येथील १४७ जणांची घरे जाणार आहेत. त्यांचे पुर्नवसन केले जाणार आहे,’ असे राम यांनी सांगितले.
