पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रशासकीय व सेवाविषयक तक्रारी असतात. या तक्रारी प्रलंबित राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या निवृत्तवेतन लाभाला फटका बसतो. तसेच सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्रलंबित राहिल्याने त्यांच्या कामावर परिणाम होतो. यामुळे आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन त्यांच्या सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशी आरोग्य विभागाची अपेक्षा आहे.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तक्रारींचे निवारण करण्यासाठी आरोग्य अदालत मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात प्रशासकीय पंचसूत्री कार्यप्रणाली राबवून तक्रारी निकाली काढण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार यांनी ही मोहीम सुरू केली आहे. पुणे परिमंडळात पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ७ एप्रिलपर्यंत ५००१ तक्रारी निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परिमंडळातील सर्व कार्यालयांतील प्रलंबित प्रकरणांची माहिती मागवून त्यांची सुनावणी घेण्य़ाचे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
तक्रारी कोणत्या?
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व सेवाविषयक तक्रारींमध्ये बदली, पदोन्नती, मानधन अथवा वेतन, रजा, कामाचा ताण, नियुक्ती आदेश, सेवाशर्ती यांचा समावेश आहे. या तक्रारी दीर्घ काळ प्रलंबित राहतात. वरिष्ठांकडून वेळेत निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होतो. वैयक्तिक व सेवाविषयक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमी होऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होते. याचबरोबर कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद नसल्याने गैरसमज आणि तणाव निर्माण होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी नियमांनुसार ऐकून त्यावर स्पष्ट आणि पारदर्शक निर्णय देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
५ हजार तकारी निकाली काढणार
पुणे परिमंडळातील आरोग्य विभागाच्या सर्व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती मागविण्यात आली. या प्रकरणांची सुनावणी घेण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारी ठरावीक कालमर्यादेत निकाली काढण्यात येत आहेत. आरोग्य अदालत घेऊन ५००१ तक्रारी निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
