पुणे: उन्हाळा सुरू झाला की राज्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. पुण्यात विदर्भ, मराठवाड्याइतकी उन्हाची तीव्रता नसली, तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून पुण्यामध्ये तापमानाचा पारा एप्रिलमध्येच चाळीशी गाठत आहे. त्यामुळे शहरांमध्ये उष्माघाताचे बळी नसले तरी उष्माघाताचे रुग्ण मात्र आढळत आहेत. हा आजार गंभीर स्वरूपाचा असून, तो टाळण्यासा विविध उपाययोजनांचा अवलंब करण्याचा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
शरीराचे तापमान सर्वसाधारणपणे ३७ अंश सेल्सिअस इतके असते. बाहेरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर उष्णतेचा त्रास होऊ शकतो. मात्र, आवश्यक ती काळजी घेतल्यास उष्माघातापासून बचाव करता येतो. पुण्यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून उन्हाची दाहकता वाढत आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात उन्हाची तीव्रता असणार आहे. असे असले, तरी योग्य काळजी घेतल्यास हा उन्हाळा सुसह्य ठरू शकतो.
उन्हाळ्यामध्ये गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले, जुन्या व्याधी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उष्माघाताची लक्षणे काय ?
घाम न येणे, ताप येणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, अस्वस्थता वाटणे, तीव्र डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे, बेशुद्ध अवस्था, लघवी न होणे, छातीची धडधड वाढणे.
काय काळजी घ्याल ?
- उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिणे, ताक, नारळ पाणी, विविध फळांची सरबते याचे प्रमाण वाढवून शरीराला निर्जलीकरणापासून (डीहायड्रेशन) बचावणे
- शक्यतो दुपारी बाहेर पडणे टाळा. अगदीच आवश्यक असल्यास गॉगल, टोपी या उन्हापासून बजाव करणाऱ्या वस्तूंचा वापर करावा.
- सुती कपडे वापरावेत. गरमीचा त्रास खूप जाणवत असेल, तर घरात वाळ्याचे पडदे लावावेत, पंखा सुरू ठेवावा. सतत ओला सुती कपडा जवळ बाळगावा.
थंड पाणी टाळा
उन्हाळा वाढला, की आपसूकच थंड पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. मात्र, शरीरासाठी हे घातक असून, शक्यतो सर्वसामान्य तापमानातील पेय घ्यावे. दुपारी उन्हात बाहेर फिरायची वेळ आली, तरी थंड पाणी पिऊ नये किंवा बर्फही खाऊ नये. हे शरीरासाठी अपायकारक असून, कडक उन्हात विलक्षण थंड पदार्थ घेणेही जोखीम ठरू शकते. आहारात खुप तेलकट पदार्थ टाळावेत. घरात असले, तरी वातानुकूलन यंत्रणेत राहणे टाळावे.
उष्माघातापासून स्वत:ला दूर ठेवायचे असेल, तर एक ते चार या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये. अगदीच बाहेर पडणे गरजेचे असेल, तर भरपूर पाणी प्या आणि मगच बाहेर पडा. त्याचबरोबर शक्यतो बाहेरचे थंड पाणी आणि बर्फ घेऊ नका. उन्हाळ्यामध्ये अनेक जण दुपारी पोहायला जातात. मात्र, हेही अतिशय घातक असून, यामुळे उलट्या, जुलाब असे त्रास उद्भवू शकतात.-डॉ. अनिकेत जोशी, जनरल फिजिशियन
उष्माघाताचा अधिक त्रास गर्भवती स्त्रियांना होत असतो. गर्भवती स्त्रीला उष्माघाताचा त्रास झाला, तर एकतर लवकर किंवा उशिरा बाळंतपण होते. बऱ्याच गरोदर महिलांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम थेट बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे उष्माघातामध्ये गर्भवती स्त्रियांनी बाहेर पडणे पूर्ण टाळावे.-डॉ. अलका क्षीरसागर, स्त्री रोगतज्ज्ञ, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
अनेक मुलांना उष्माघाताचा त्रास झाल्याची उदाहरणे आहेत. मुलांना दुपारी बाहेर खेळायला पाठवू नये. जर उष्माघाताची लक्षणे लहान मुलांमध्ये आढळली, तर सर्वात आधी ओला टॉवेल किंवा सुती पंचा मुलाच्या अंगावरून सतत फिरवावा. जी घामाची प्रक्रिया शरीराच्या आतून होत आहे ती पालकांनी या पद्धतीने बाहेरून करावी. त्यामुळे मुलांना त्वरित आराम मिळू शकतो. तसेच, त्यांना लघवी होते, की नाही यावरही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अशा वेळी फरशीवर पाणी टाकणे, पंखा चालू ठेवावा. या गोष्टीही त्वरित कराव्यात.-डॉ. जयंत नवरंगे, बालरोगतज्ज्ञ
उष्माघातामुळे डोळे सुकणे, लाल होणे तसेच प्रचंड डोकेदुखी होऊ शकते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांच्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन नजर धूसर होऊ शकते. जास्त उष्णतेने रक्ताची वाहकता कमी होते. कधी कधी डोळ्याची रक्तवाहिनी बंद होऊ शकते त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे. घरात असतानाही खूप उष्णता असल्यास डोळ्यांवर पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या. डोळे लाल होऊन दुखत असतील अथवा नजर धूसर झाली असल्यास त्वरित नेत्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
डॉ. गीतांजली शर्मा, नेत्ररोग तज्ज्ञ, माजी अध्यक्ष, पुणे नेत्रतज्ज्ञ संघटना
